
अमेरिका, इस्रायल इराणमधील युद्धामुळे सुरक्षेसाठी आखाती देशासह अनेक देशांनी आपल्या हवाई सीमा उड्डाणांसाठी बंद केल्या आहेत. आखाती देशांनी हवाई सीमा बंद केल्याचा परिणाम सर्वच देशांवर झाला आहे. अनेक देशातील हवाई प्रवास रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. हिंदुस्थानातूनही १८० हवाई उड्डाणे रद्द करण्यात आली असून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अनेक देशांमधील विमानतळांवर शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे हजारो प्रवासी अडकले आहेत.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाचा विमान सेवांवरही परिणाम होत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि अनेकांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही विमानतळांवरील सेवा तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कतारची राजधानी दोहा येथील भारतीय दूतावासाने एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. दूतावासाने म्हटले आहे की, कतारचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. कतार एअरवेजसह इतर विमान कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत.
एअर इंडियाने जाहीर केले आहे की आखाती देशात जाणारी त्यांची बहुतेक उड्डाणे ५ मार्च २०२६ रोजी रात्री ११:५९ (IST) पर्यंत स्थगित राहतील. तथापि, जेद्दाला जाणाऱ्या काही नियोजित उड्डाणे ५ मार्चपासून पुन्हा सुरू होतील. यामध्ये दिल्ली-जेद्दाह-दिल्ली आणि मुंबई-जेद्दाह-मुंबई मार्गांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अडकलेल्या प्रवाशांना परत आणण्यासाठी एअर इंडिया ५ मार्च रोजी सकाळी मुंबई-दुबई-दिल्ली मार्गावर अतिरिक्त उड्डाण चालवण्याची योजना आखत आहे. ही उड्डाणे मोठ्या B777 विमानांनी चालविली जातील, ज्यांची प्रवासी क्षमता जास्त आहे.
हवाई निर्बंधांमुळे ४ मार्च रोजी मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरूसारख्या प्रमुख शहरांमधील विमानतळांवरून अंदाजे १८० उड्डाणे रद्द करण्यात आली. मुंबई विमानतळावर ४८ निर्गमन आणि ४५ आगमन अशा एकूण ९३ उड्डाणे रद्द करण्यात आली. दिल्ली विमानतळावर २५ निर्गमन आणि २७ आगमन अशा ५२ उड्डाणे रद्द करण्यात आली. बेंगळुरू विमानतळावर १८ आगमनांसह विविध विमान कंपन्यांच्या ३४ उड्डाणे रद्द करण्यात आली.
प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे काही विमान कंपन्यांनी इतर आंतरराष्ट्रीय मार्गांवर अतिरिक्त उड्डाणे सुरू केली आहेत. एअर इंडियाने दिल्लीहून टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिससाठी अतिरिक्त उड्डाणे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने मस्कत, दिल्ली आणि मुंबई दरम्यान अतिरिक्त सेवा जाहीर केल्या आहेत. संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना उड्डाण रद्द झाल्यामुळे किंवा हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे वेळेवर देश सोडता आला नाही त्यांच्यासाठी ओव्हरस्टे दंड माफ केला आहे. याचा परिणाम आता जगभरातील हवाई प्रवासावर होत आहे. विमान कंपन्या सतत उड्डाणे रद्द करत आहेत किंवा बदलत आहेत आणि प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या विमान कंपनीशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
























































