
अमेरिका, इस्रायल इराण युद्धाचा आज सहावा दिवस आहे. सहाव्या दिवशीही युद्धाची तीव्रता कायम आहे. त्यातच इराणने हार्मिझची सामुद्रधुनीचा मार्ग रोखला आहे. कोणतेही जहाज या सामुद्रधुनीत दिसल्यास ते उडवून देण्याची धमकी इराणने दिली आहे. त्यामुळे या सामुद्रधुनीद्वारे होणारी तेलवाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचा फटका हिंदुस्थान, चीनसह आशियाई देशांना बसत आहे. या संकटाच्या काळात रशियाने हिंदुस्थानला मदतीचा हात दिला आहे.
आखाती देशात वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा व्यापारासाठी एक महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाची वाहतूक रोखण्यात आली आहे. या कठीण काळात रशियाने हिंदुस्थानला मदतीचा हात दिला असून ते त्यांच्या कच्च्या तेलाची जहाजे हिंदुस्थानात वळवण्यास तयार आहे. या शिपमेंट लवकरच हिंदुस्थानात पाठवल्या जाण्याची शक्यता आहे. सध्या हिंदुस्थानकडे फक्त २५ दिवसांचा तेलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रशियाकडून कच्चे तेल हिंदुस्थानात आल्यास तो मोठा दिलासा ठरणार आहे.
रॉयटर्सच्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, सध्या हिंदुस्थानी समुद्राजवळील जहाजांवर सुमारे 95 लाख बॅरल रशियन कच्चे तेल साठवले आहे आणि काही आठवड्यांत ते हिंदुस्थानात पोहोचवण्यात येऊ शकते. सामुद्रधुनीमार्गे हिंदुस्थानला सुमारे ५०% तेल आयात होते, आता ते रोखले गेले आहे. त्यामुळे हिंदुस्थानात तेल संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशावेळी रशिया हिंदुस्थानच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
रशियाचे कच्चे तेल हिंदुस्थानात आल्यास देशातील रिफायनर्ससाठी हा महत्त्वपूर्ण दिलासा ठरणार आहे. गरज पडल्यास गैर-रशियन फ्लीट जहाजांद्वारे वाहून नेलेला माल त्वरित हिंदुस्थानात वळवता येऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे. हिंदुस्थानकडे सध्या मर्यादित तेल साठा आहे, त्यामुळे तेल पुरवठा सुरू ठेवण्यासाठी पर्याय शोधत आहे. हिंदुस्थानकडे सुमारे २५ दिवसांची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे कच्चे तेल साठे आहे. तर डिझेल, पेट्रोल आणि पेट्रोलियम गॅस सारख्या शुद्ध उत्पादनांचा साठा देखील कमी आहे.
आखाती देशातील युद्ध पुढील १०-१५ दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेल वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीभोवती असलेल्या अस्थिरतेमुळे हिंदुस्थानच्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे. देशातील रिफायनरीज दररोज अंदाजे ५.६ दशलक्ष बॅरल तेल शुद्ध करतात. त्यामुळे तेल मर्गाच्या वाहतुकीत दीर्घकाळ अडचण आल्यास तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते. आखाती देशांमधून कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्यास रशिया ही तफावत भरून काढण्यास मदत करण्यास तयार आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या कच्च्या तेलाच्या ४०% गरजा पूर्ण होणार आहे.


























































