
मध्यपूर्वेतील संघर्ष आता एका अत्यंत टोकाच्या वळणावर येऊन पोहोचला असून, इस्रायलने इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना शोधून ठार मारण्याची उघड धमकी दिली आहे. मोजतबा खामेनी सध्या कोठे आहेत याची माहिती जरी नसली किंवा ते सार्वजनिकरित्या दिसत नसले, तरी इस्रायल त्यांना शोधून काढत संपवू असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
इस्रायलने इराणचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांना हवाई हल्ल्यात ठार केल्याचा दावा केला आहे. लारीजानी हे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे अत्यंत विश्वासू आणि इराणच्या सुरक्षा धोरणांचे मुख्य शिल्पकार मानले जात होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी लारीजानी यांच्या मृत्यूची पुष्टी करत, तेच खऱ्या अर्थाने इराणची सत्ता चालवत असल्याचे म्हटले आहे. इराणी जनतेच्या मदतीने तिथली राजवट उलथवून टाकण्यासाठी इस्रायलचे प्रयत्न सुरूच राहतील, असा निर्धारही नेतान्याहू यांनी यावेळी व्यक्त केला.
इराणमध्ये 28 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या अमेरिका-इस्रायल हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर 9 मार्च रोजी त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, मोजतबा अद्याप एकदाही लोकांसमोर आलेले नाहीत, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत आणि सुरक्षिततेबाबत गूढ वाढले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नेतान्याहू यांनी आपल्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेचे राजदूत माईक हकाबी यांच्यासोबतच्या एका व्हिडिओमध्ये नेतान्याहू यांनी हसत हसत “मी अजून जिवंत आहे” असे म्हणत विरोधकांची खिल्ली उडवली.






























































