वेळ लागला तरी… उपचार परिणामकारक

>> वैद्य सत्यव्रत नानल

आयुर्वेदाने चिकित्सा करताना रोग मुळापासून ठीक तर होतात पण वेळ खूप लागतो, असा एक गैरसमज पसरवला जातो. या प्रश्नाचे अर्धे उत्तर होयआणि अर्धे उत्तर नाहीअसे आहे. एक मात्र नक्की की, आयुर्वेदाने चिकित्सा करताना वेळ लागला तरी उपचार परिणामकारक असतात.

आयुर्वेद म्हणजे आपले प्राचीन वैद्यकशास्त्र् आहे. आज देशात आणि परदेशात खूप मोठय़ा प्रमाणात याला मागणी वाढते आहे. त्यामुळे याबद्दल समाजात असलेल्या काही गैरसमजुती दूर करणे अत्यावश्यक झाले आहे. अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून त्याला दुय्यम स्थान दिले जाते, तो व्यावसायिक प्रचार आहे तथ्य नाही. प्रत्येक शास्त्र्ाची आपापली बलस्थाने आहेत. आपापले दृष्टिकोन आहेत. अनेक रोगांना इतर चिकित्सा प्रणालीमध्ये औषधे नाहीत, पण आयुर्वेदात अनेक औषधे आहेत. लोक ती घेऊन बरेही होतात, पण ते लोकांच्या समोर मोठय़ा प्रमाणात जात नाही. त्याऐवजी आजकाल आयुर्वेदाच्या नावावर अनेक गोष्टी आणि गैरसमज समाजात पसरवले जातात. त्यापैकी एक म्हणजे, ‘आयुर्वेदाने चिकित्सा करताना रोग मुळापासून ठीक तर होतात, पण वेळ खूप लागतो.’ याबद्दल आज नेमके काय ते पाहूया.

 या प्रश्नाचे अर्धे उत्तर ‘होय’ आणि अर्धे उत्तर ‘नाही’ असे आहे. कसे ते आपण आता पाहू.

 आयुर्वेदात रोगाची मुळापासून चिकित्सा केली जाते?

उत्तर  हो, हे बरोबर आहे. आयुर्वेदाची निदानाची स्वतःची एक स्वतंत्र पद्धत आहे.  निदानातील मूळ कारणांपासून ते होणाऱया त्रासांपर्यंत सर्व गोष्टींचा विचार करून निष्कर्ष निश्चित केले जातात आणि आहार, विहार आणि औषधी यांनी चिकित्सा  केली जाते.

 आयुर्वेदातील चिकित्सेला वेळ खूप लागतो?

उत्तर  या प्रश्नाचे उत्तर समजून घ्यायला आयुर्वेदाने सांगितलेले रोगांचे प्रकार समजून घेणे गरजेचे आहे. आधी म्हटल्याप्रमाणे आयुर्वेदाची प्रत्येक रोगाच्या निदानाची स्वतःची एक स्वतंत्र पद्धत आहे. रोगांचे वर्गीकरण चार प्रकारांत केले जाते. ते  खालीलप्रमाणे

सुखसाध्य रोग  जे रोग फार त्रास न देता बरे होतात ते या वर्गात मोडतात.  रोगप्रतिकार शक्ती चांगली असते त्यांना  अशा रोगात लगेच गुण येतो.

कष्टसाध्य रोग  जे रोग रुग्णास आणि वैद्यासही बराच त्रास देतात ते रोग या प्रकारात मोडतात.  रुग्णांना अशा रोगांमध्ये औषधे लांबपर्यंत घ्यावी लागू शकतात, पण हे रोग बरे होणारे असतात.

याप्य रोग  जोपर्यंत आहार, औषधे, विहार या सर्व गोष्टी रोगी व्यक्ती व्यवस्थित पालन करते, तोपर्यंत आटोक्यात राहणारे रोग म्हणजे याप्य रोग. मधुमेह, संधीवात, आमवात वगैरे अनेक रोग आहेत जे या वर्गात मोडतात. सोबतच इतर अनेक रोग ही आहेत जे शरीरात एक किंवा दोन वर्षांपेक्षा जास्त वेळपर्यंत चिकित्सा न मिळाल्याने तसेच राहतात.

अनुपक्रम /असाध्य रोग  यामध्ये असे रोग येतात ज्यांना बरे करणे शक्य नसते आणि ज्यात आयुष्याला किंवा जीवालाही धोका निर्माण झालेला असतो. अशा रोग्यांमध्ये तात्कालिक/तात्पुरती चिकित्सा करून होणारे त्रास कमी करणे हेच फक्त शक्य होते. ज्याने रोग्याचे आयुष्य थोडे सुकर होते.

आता आयुर्वेदातील चिकित्सेने वेळ लागतो याचे उत्तर नाही असे का होते हे लक्षात येईल. कष्टसाध्य रोगप्रकार यामध्येच फक्त वेळ जास्त लागू शकतो. रोग जेव्हा बरा होण्यापलीकडे गेलेला असतो, तेव्हा चिकित्सेला वेळ लागतो असे म्हणण्यात काहीच मतलब राहत नाही. कारण रोग आटोक्यात ठेवणे हे काम आयुष्यभर करावेच लागणार असते. म्हणजे चिकित्सा आयुष्यभर चालणार असते.

यापुढे आत्यायिक रोगांची चिकित्सा (इमर्जन्सी ट्रीटमेंट) या अंतर्गत ही अनेक रोग आणि अवस्था मोडतात. आयुर्वेदात इमर्जन्सी ट्रीटमेंट नाहीत हाही एक गैरसमज आहे. अनेक रोगावस्था आहेत ज्यांची आयुर्वेदाने त्वरित चिकित्सा करून दिली जाऊ शकते. यासाठी रुग्णास घरी ठेवून आणि गरज पडल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करूनसुद्धा काम केले जाऊ शकते. श्वास लागणे, कोरडा खोकला, अपेंडीक्स, मूतखडे, चक्कर येणे, डोकेदुखी, मायग्रेन, पोटदुखी, ताप यांपासून ते हृदयाचे तीव्र झटके वगैरेपर्यंत अनेक अवस्थांची आयुर्वेदानुसार त्वरित चिकित्सा करून रोग्यांचे जीव ही वाचवले जातात. यामध्ये वैद्याचा अभ्यास, रोगी व रोग्याचे नातेवाईक यांचा वैद्यावरील दृढ विश्वास, सहनशक्ती यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. वैद्य नानल परंपरेतील गेल्या चार पिढय़ांमधील असे हजारो अनुभव आहेत. माझ्या गेल्या वीस वर्षांच्या अनुभवात ही असे वेगवेगळे प्रकार मी स्वतः पाहिलेले आहेत. त्यामुळे आयुर्वेदाने अनेक रोगांमध्ये आत्ययिक चिकित्सा अतिशय उत्तमरित्या करता येते हे मी ठामपणे सांगू शकतो.

वरील सर्व गोष्टी वाचून हे नेमके लक्षात येईल की, आयुर्वेदाने चिकित्सा करताना वेळ लागतो या विधानाला तसा काहीही अर्थ राहत नाही.