म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरताना अर्जदारांना आता आयटीआर पासवर्ड टाकावा लागणार आहे. तसेच आयकर खात्याला टू स्टेप व्हेरिफिकेशन लावलेले असेल तर ते अर्ज प्रक्रिया होईपर्यंत काढून टाकावे, असे आवाहनदेखील म्हाडाने केले आहे. गतवर्षी झालेल्या सोडतीवेळी काही अर्जदारांच्या आयटीआरमध्ये तफावत आढळली होती, तर काही अर्जदारांनी आयटीआरचे अस्पष्ट फोटो अपलोड केल्यामुळे अशा अर्जदारांचे खरे उत्पन्न जाणून घेण्यात म्हाडाला अनेक अडचणी आल्यामुळे हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
याबाबत मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी (पणन) राजेंद्र गायकवाड म्हणाले, अर्ज करताना उत्पन्नाचा पुरावा म्हणून आर्थिक वर्ष 2023-24 चे आयटीआर सादर करणे गरजेचे आहे. म्हाडाने आयकर विभागाकडून एपीआय घेतला आहे. अर्जदाराने आयकर विभागाकडे अपलोड केलेले आयटीआर रिटर्न संबंधित अर्जदाराने परवानगी दिली तरच म्हाडाला उपलब्ध होईल. परवानगी देणे म्हणजे अर्ज भरतेवेळी संबंधित लॉगिनमध्ये पासवर्ड टाकणे. हा पासवर्ड म्हाडाला डिस्कोज होत नाही. त्यामुळे अर्जदारांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या ऑनलाईन संगणकीय सोडतीबाबत अर्जदारांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी सोमवारी म्हाडातर्फे ऑनलाइन वेबिनारचे आयोजन केले होते. यात सुमारे 4500 अर्जदारांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. संगणकीय सोडतीकरिता अर्ज करण्यासाठी https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा व MHADA HOUSING LOTTERY SYSTEM या अॅपचाच वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
लग्नाबाबत खोटी माहिती दिल्यास घराला मुकावे लागणार
विवाहित अर्जदारांनी अर्ज भरताना विवाहित म्हणूनच नमूद करणे गरजेचे असून तसे न केल्यास सोडतीत विजेते ठरलेल्या संबंधित अर्जदाराला घराला मुकावे लागणार आहे असे म्हाडाने स्पष्ट केले आहे. घटस्फोटीत अर्जदारांना घर ताब्यात देतेवेळी डिक्री सादर करावी लागणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील अर्जदारांना घराचा ताबा घेण्यापूर्वी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असल्याचेही म्हाडाने सांगितले.