
अहमदाबाद विमान अपघातात प्रवासी व स्थानिक नागरिक अशा जवळपास 300 जणांना प्राण गमवावा लागला. त्यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. या संकटकाळात रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष, उद्योजक मुकेश अंबानी यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अपघातातील जिवीतहानीबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आणि बचावकार्यात शक्य त्या प्रत्येक प्रकारे मदतीसाठी तयार असल्याचे जाहीर केले.
विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक जखमींची अद्याप मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्यांच्याबद्दल मुकेश अंबानी यांनी कुटुंबियांतर्फे संवेदना व्यक्त केल्या. नीता आणि मी तसेच संपूर्ण रिलायन्स कुटुंब अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःखी झालो आहोत. या दुःखद घटनेत प्राण गमावावा लागलेल्या सर्वांबद्दल आम्ही मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या काळात रिलायन्स कुटुंब मदत व बचाव कार्यासाठी पूर्णपणे आणि ठामपणे पाठीशी उभी आहे. शक्य त्या प्रत्येक प्रकारे मदतीसाठी आम्ही तयार आहोत. या अपरिमित दुःखाच्या परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती आणि धैर्य सर्वांना मिळो, हीच प्रार्थना, अशा शब्दांत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचेअध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी भावना व्यक्त केली.



























































