पैठण – जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडले, गोदावरी नदीच्या काठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

बद्रीनाथ खंडागळे

जायकवाडी धरणाच्या 9 आपात्कालीन दरवाजांसह सर्व 27 दरवाजे शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास उघडण्यात आले. या धरणातून सध्या प्रतिसेकंद तब्बल 94 हजार 320 क्युसेक्स एवढा जलप्रवाह गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे.  पहाटे 3.30 ते 4 या दरम्यान दरवाजे उघडण्याची ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता बुध्दभुषण दाभाडे यांनी दिली.

27 पैकी 9 दरवाजे हे आपत्कालीन समजले जातात. आणीबाणी प्रसंगी उघडण्यात येणारे हे 9 दरवाजे शुक्रवारी प्रत्येकी 2 फुट तर उर्वरीत 18 दरवाजे 4 फुट वर ऊचलण्यात आले आहेत. याशिवाय दोन्ही कालव्यांतूनही जलविसर्ग केला जात आहे. एकुण 94 हजार 320 क्युसेक्स एवढा जलप्रवाह नदीपात्रात सोडला जात आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात 94 हजार 320 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोदावरीच्या तीरावर असलेल्या तालुक्यातील 14 गावांसह शहरवासीयांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जलसंपदा विभाग आणि पोलीस प्रशासनाने हा इशारा दिला आहे. गोदावरी नदीचे पात्र फुगायला लागले असल्याने नाथमंदिराच्या मागे असलेल्या दशक्रिया विधीसाठीच्या मोक्षघाटापर्यंत पाणी पोहोचले आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत नागघाटाच्या पायऱ्या बुडायला लागल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या