पंतप्रधान मोदींनी रशियाकडून तेल न खरेदी करण्याचे आश्वासन दिलं होतं का? ट्रम्प यांच्या दाव्यावर काँग्रेसचा सवाल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार असं का म्हणत आहेत की, त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली आहे. या चर्चेत पंतप्रधान मोदींनी रशियाकडून तेल न खरेदी करण्याचे आश्वासन दिलं होतं का? असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला विचारला आहे. क्स वर एक पोस्ट करत त्यांनी हा प्रश्न विचारला आहे.

जयराम रमेश म्हणाले की, “ट्रम्प यांनी गेल्या पाच दिवसांत रशियाकडून हिंदुस्थानच्या तेल खरेदीचा मुद्दा तीन वेळा उपस्थित केला आहे आणि या आठवड्यात बुडापेस्टमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेण्यापूर्वी ते निःसंशयपणे तो आणखी वारंवार करतील.”

ते म्हणाले, “ट्रम्प असा दावा करत आहेत की, त्यांनी मोदींशी चर्चा केली आणि हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचं आश्वासन दिलं. मात्र हा दावा हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयानं (MEA) फेटाळून लावला आहे. परंतु ट्रम्प यांनी मंत्रालयाचा नकार फेटाळून लावला आहे.”