दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून राजस्थानमधील रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती मिळते. हनुमानगड रेल्वे स्थानकावर धमकीचे पत्र आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पत्रात 30 ऑक्टोबर रोजी अनेक रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.
हे पत्र हनुमानगड स्टेशन मास्टरला पोस्टाने देण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली, असे हनुमानगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्यारे लाल मीना यांनी सांगितले.
’30 ऑक्टोबरला बॉम्बस्फोट होणार’
जैश-ए-मोहम्मदच्या नावाने आलेल्या या पत्रात ‘येत्या 30 ऑक्टोबरला गंगानगर, हनुमानगड, जोधपूर, बिकानेर, कोटा, बुंदी, उदयपूर, जयपूर येथील रेल्वे स्टेशन आणि अन्य ठिकाणांवर बॉम्बस्फोट करण्यात येतील’, अशी धमकी देण्यात आली आहे.
धमकीची माहिती मिळताच गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी), स्थानिक पोलिस आणि बीएसएफच्या जवानांनी अनेक ठिकाणी शोध घेतला. याप्रकरणी जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.