जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरील उड्डाणपुलाचे काम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील रेल्वे स्टेशनमधील पश्चिमेच्या बाजूस असलेल्या रेल्वे लाईनवर उड्डाणपूल व्हावा यासाठी 45 कोटी रुपये खर्चास मान्यता मिळाली होती. त्यामुळे जयसिंगपूर नगर परिषदेने नेमलेल्या एजन्सीमार्फत पूल उभारणीसाठी माती परीक्षण करण्याच्या कामाला सुरुवात झाली.

जयसिंगपूर हे शहर सांगली आणि कोल्हापूर जिह्याच्या मध्यभागी असल्याने या शहरातून सांगली-कोल्हापूरला जोडणारा रस्ता जातो. या रेल्वे मार्गावरून जयसिंगपूर तसेच शिरोळ तालुक्यातून, बाहेरून येणाऱ्या अनेक गावांतून दानोळी, कोथळी, उमळवाड, कवठेसार, कुंभोज याचबरोबर पश्चिमेकडे असलेल्या सर्व गावांसह अगदी वडगांव, वाठार, पुणे-मुंबई महामार्गापर्यंत ये-जा करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे रेल्वे लाईन क्रॉस करून दररोज हजारो लहान-मोठी वाहने येथून धावत असतात, मालवाहू गाडय़ांची संख्याही मोठी आहे, अनेक शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, शेतीमालाच्या विक्रीच्या निमित्ताने येणारे शेतकरी, नोकरीच्या निमित्ताने जयसिंगपूर आणि परिसरातून ग्रामीण भागातून येणारे नोकरदार यांची मोठी रहदारी या मार्गावर असते.

मागील अनेक वर्षांपासून या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या या तमाम नागरिकांची या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी मागणी होती, यासाठी 45 कोटी रुपये खर्चास तत्त्वतः मान्यता मिळाली होती. रेल्वे प्रशासन, महाराष्ट्र शासन व शासनाच्या नगर विकास विभागाच्या समन्वयाने हा उड्डाणपूल उभारला जाणार आह़े नगर विकास विभागाने जयसिंगपूर नगरपालिकेत नुकतेच पत्र लिहून यापूर्वी याबाबत सर्व प्रकारचा सर्व्हे पूर्ण करून तांत्रिक मान्यतेबाबत तातडीने अहवाल सादर करावा असे कळविले. यानंतर जयसिंगपूर नगरपरिषदेने या कामासाठी एजन्सी नेमून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आह़े माती परीक्षण करण्यामागे पुलावरून किती वाहतूक होते आणि ती पेलण्यासाठी उड्डाणपुलाची क्षमता काय असावी हा हेतू आहे.

जयसिंगपूर नगरपालिका लवकरच याबाबतचा विस्तृत अहवाल महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाला सादर करेल. त्यानंतर नगर विकास विभाग सदरचा अहवाल शासनाच्या अर्थ विभागाला सादर करून निधीची तरतूद केली जाईल. त्यामुळे या रेल्वेमार्गावर लवकरच उड्डाणपूल उभारणीचा मार्ग सुकर होईल. या रेल्वे उड्डाणपुलाचा फायदा जयसिंगपूर शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठय़ा प्रमाणात होईल, रुग्णांना वेळेत उपचारासाठी दवाखान्यात नेणे सोयीचे होईल, रेल्वे फाटक बंद असल्याच्या काळात गंभीर रुग्णांना दवाखान्यात नेताना उशीर झाल्यामुळे अनेकांनी प्राण गमावले आहेत, महापुराच्या काळात नागरिकांना बाहेर पडणे अथवा स्थलांतरित करणे अतिशय सोयीचे होईल, विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षणासाठी वेळेत पोहोचता येईल. नोकरदार वेळेवर आपल्या कामाच्या ठिकाणी हजर होऊ शकतील. त्याचबरोबर शेतीमाल घेऊन विक्रीसाठी येणारे शेतकरी बाजारपेठेमध्ये लवकर पोहोचतील. त्यामुळे या सर्व घटकांना या रेल्वे उड्डाणपुलाचा मोठा फायदा होणार आहे.