
इस्रायल-इराण संघर्षाचा फटका जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. मध्य पुर्वेतील संघर्षामुळे केळीच्या घाऊक दरात मोठी घसरण झाली आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने केळी तोट्यात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सध्या घाऊक बाजारात केळीचा दर प्रति किलो 8 ते 10 रुपया इतका असून उत्पादन खर्च सुमारे 12 रुपये प्रति किलो आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
जळगाव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा केळी उत्पादक जिल्हा असून येथे दरवर्षी सुमारे 4 दशलक्ष टन उत्पादन होते. सहा तालुक्यांतील सुमारे 50,000 शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत.
एकूण उत्पादनापैकी सुमारे 10 टक्के केळी आखाती देशांमध्ये, विशेषतः इराण आणि इराक येथे निर्यात केली जाते. उर्वरित उत्पादन राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या उत्तर भारतीय राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवले जाते. साधारणपणे देशांतर्गत बाजारात शेतकऱ्यांना 14 ते 15 रुपये प्रति किलो दर मिळतो, तर निर्यातीतून 18 रुपयांपेक्षा जास्त दर मिळतो.
जळगावमधील निर्यातदार विशाल अग्रवाल यांनी सांगितले की, “मार्च ते डिसेंबर दरम्यान दररोज 100 पेक्षा अधिक कंटेनर इराण आणि इराकला पाठवले जातात. प्रत्येक कंटेनरमध्ये सुमारे 20 टन केळी असतात. मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर निर्यात पूर्णपणे ठप्प झाली होती. आता पुन्हा निर्यात सुरू झाली असली तरी मालवाहतुकीचा खर्च 3,000 डॉलर वरून जवळपास 12,000 डॉलर प्रति कंटेनर इतका वाढला आहे, त्यामुळे अनेक निर्यातदारांनी कामकाज थांबवले आहे.”
जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केळी उत्पादक तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. “काही व्यापारी कार्टेल तयार करून दरांवर परिणाम करत असल्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात रावेर येथे व्यापारी आणि शेतकऱ्यांसोबत आणखी बैठक घेणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
घुगे यांनी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे. बुऱ्हाणपूर येथील बाजारभावांचा जळगावच्या दरांवर मोठा प्रभाव पडतो. हे शहर रावेरपासून सुमारे 20 किमी अंतरावर आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, निर्यातदार सध्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत नसल्यामुळे शेतकऱ्यांची सौदेबाजीची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे व्यापारी कमी दरात व्यवहार करून आपला नफा वाढवत आहेत. याशिवाय भविष्यात इंधन टंचाई निर्माण झाल्यास उत्तर भारतात मालवाहतूक विस्कळीत होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
रावेर येथील शेतकरी रामदास पाटील यांनी सांगितले की, “मी 200 क्विंटल केळी 10 रुपये प्रति किलो दराने विकली. तोटा असूनही वेळेत काढणी करावी लागली, अन्यथा केळी खराब झाली असती. साठवणूक करता येत नसल्यामुळे पर्याय नव्हता.”
दुसरे शेतकरी भगवत पाटील म्हणाले, “मी 1,000 क्विंटल केळी 8 रुपये प्रति किलो दराने विकली. व्यापारी चांगला दर देत नाहीत. प्रशासनाने हस्तक्षेप करून आम्हाला योग्य दर मिळवून द्यावा. निर्यात घटली असली तरी देशांतर्गत बाजारात तरी योग्य किंमत मिळावी.”































































