सविस्तर निकाल तयारच नाही; जळगाव घरकुल घोटाळ्याचा अंतिम निकाल 1 ऑगस्टला

87

सामना प्रतिनिधी । धुळे

जळगाव येथील घरकुल घोटाळा प्रकरणी अंतिम निकालासाठी आता 1 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. कारण न्यायालयाकडून अद्याप सविस्तर निकाल तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे तो जाहीर झाला नाही. घरकुल घोटाळ्यात अनेक कागदपत्रांचा संदर्भ घ्यावा लागणार आहे. त्यामुळे निकालास विलंब होण्याची शक्यता अधिक आहे, अशी माहिती घोटाळ्याचा दोषारोप असणाऱ्यांचे वकील जितेंद्र निळे यांनी दिली. दरम्यान, निकालासाठी खटल्यातील सर्व 48 संशयित न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. घरकुल घोटाळ्यात माजी आमदार सुरेश जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.

जळगाव महापालिकेने झोपडपट्टी निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत 1998 मध्ये घरकुल नसणाऱ्यांसाठी घरकुल बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार 11 हजार 424 घरकुले बांधण्यास सुरुवात झाली. परंतु, ज्या जागेवर ही घरकुले उभारण्यात येत आहेत ही जागा जळगाव महापालिकेच्या मालकीची नाही. दिशाभूल करून योजना राबविली जात आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला जात आहे अशी तक्रार 2001 मध्ये झाला. आरोप-प्रत्यारोप आणि चौकशीचा फेरा पूर्ण झाल्यानंतर कथित घरकुल घोटाळा प्रकरणी 2004 मध्ये 29 कोटी 59 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, असा गुन्हा दाखल झाला.

पोलिस प्रशासनाने चौकशीअंती माजी मंत्री सुरेश जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, तत्कालीन नगराध्यक्ष प्रदीप रायसोनी, राज मयुर, जगन्नाथ वाणी या प्रमुख व्यक्तींसह एकुण 52 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

‘न्यायालयीन कामकाज होत असताना संशयित 52 पैकी तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण फरार आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी 48 जण न्यायालयात उपस्थित होते. परंतु, निकाल पूर्ण झालेला नाही त्यामुळे तो जाहीर झाला नाही. निकाल देताना शेकडो कागदपत्रांचा संदर्भ घ्यावा लागणार आहे. त्यामुळे निकाल देण्यास विलंब होईल.’ – अॅड. जितेंद्र निळे.

आपली प्रतिक्रिया द्या