निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 60 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, खुलासा न आल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा

जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच प्रशिक्षण वर्गाला नियुक्त काही कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहून दांडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या तब्बल 60 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. समाधानकारक खुलासा न आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशारा महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिला आहे.

जळगाव महापालिकेच्या 63 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी  2 हजार 786 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी शहरातील छत्रपती संभाजीराजे नाटय़गृह येथे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणास 2 हजार 687 कर्मचारी उपस्थित होते,. मात्र काही कर्मचारी कोणतीही सूचना न देता गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले.

निवडणूक प्रक्रियेचे गांभीर्य लक्षात घेता, निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण व डय़ुटीबाबत काटेकोरपणे उपस्थित राहावे, असे स्पष्ट आदेश यापूर्वीच आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिले होते.  तरीसुध्दा प्रशिक्षण वर्गाला कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याने प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. लोकशाही प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निवडणूक यंत्रणेत शिस्त आणि जबाबदारी आवश्यक असून, यापुढे अशा प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.