
दागिन्यांसाठी एका 65 वर्षाच्या वृद्धेची तिच्याच नातवांनी कान तोडून आणि गळा आवळून हत्या केली. ही घटना राजूर जवळच असलेल्या चांदई एक्को येथे घटना घडली. या प्रकरणी हसनाबाद पोलिसांनी दोन नातवांना अटक केली.
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाणे अंतर्गत चांदई एक्को या गावात 29 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता चांदई एक्को शेत शिवारात गट नं. 256 मध्ये असलेल्या घरासमोर केशराबाई गंगाधर ढाकणे (65) या महिलेच्या कानातून नाकातून रक्त येऊन मयत झाल्याचे मुलांनी व गावातील इतर नागरिकांनी पाहिले. वृद्धेचा कान तुटलेला व सोन्याचे दागिने नसल्याचे दिसून आले. वृद्धेच्या हातातील 15 भार वजनाच्या चांदीच्या पाटल्यासुध्दा दिसल्या नाही. त्यावरुन वृद्धेचा खून करून कानातील दागिने व हातातील चांदीच्या पाटल्याही चोरुन नेल्याचे दिसून आले. मृतदेहाचे शासकीय दवाखान्यात पोस्टमार्टम केले गळा आवळुन खून केल्याचे निष्पन्न झाले. घटनेबाबत वृद्धेचा मुलगा राजू गंगाधर ढाकणे (41) रा. चांदई एक्को, ता. भोकरदन यांनी 29 एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीवरुन हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गुन्ह्याचा तपास हसनाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी आधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहिरे यांनी आधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मदतीने सुरु केला. वृद्धेचा सख्खा नातु नामे प्रदीप उर्फ काकासाहेब भरत ढाकणे (22) हा घटनेच्या वेळी चांदई एक्को येथे होता. परंतु तो नंतर फरार झाल्याचे पोलिसांना समजले. तसेच त्याच्या सोबत वृद्धेचा चुलत नातू संदीप गजानन ढाकणे (26) रा. चांदई एक्को हा पण घटनेच्या वेळी गावात होता परंतु तोही नंतर फरार झाल्याचे पोलीसांना समजले. नातू असताना आजीच्या अंत्यविधीसाठी हजर नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनीच आजीचा खून करुन दागिने चोरुन नेले असल्याचा पोलीसांना दाट संशय निर्माण झाल्याने हसनाबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यप्रदेश बॉर्डरवर आरोपीस ताब्यात घेऊन
त्यांच्या ताब्यातून दागिने व रोख जप्त केली. आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच आरोपींना न्यायालयात हजर करुन सदर गुन्ह्याचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहिरे व त्यांचे सहकारी करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस आधिकारी डॉ. गणपत दराडे यांचे मार्गदर्शनाखाली हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहिरे, पोलीस उपनिरीक्षक फकीरचंद फडे, पोलीस अंमलदार नरहरी खार्डे, पोलीस अंमलदार सोमीनाथ गाडेकर, पोलीस अंमलदार दीपक सोनुने, पोलीस अंमलदार नारायण चरावंडे, पोलीस अंमलदार प्रकाश बोर्डे, पोलीस अंमलदार राहुल भागिले, पोलीस अंमलदार सागर बाविस्कर यांनी केली.