Jalna crime news – भामट्याने लांबवले अडीच लाख, बँकेत भरणा करण्याआधीच मारला पिशवीवर डल्ला

बँकेत भरणा करण्यासाठी आणलेले 2 लाख 30 हजारांची रोकड असलेली पिशवी चोरट्याने चक्क काऊंटरवरून पळवली. ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेत घडली आहे. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शेवगा येथील रामेश्वर गणेश बारहाते हे अंबड तहसील येथे महसूल सहाय्यक म्हणून नोकरी करतात. त्यांनी बँकेत भरणा करण्यासाठी 2 लाख 30 हजार रुपयांची रोकड लाल रंगाच्या कापडी पिशवीमध्ये आणली होती. बँकेच्या काऊंटरवर पिशवी ठेऊन ते मित्रासोबत गप्पा मारत होते. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या चोरट्यांनी संधी साधत पैशांची पिशवी घेऊन पळ काढला. हा सर्व प्रकार बँकेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

चोरीची घटना घडल्यानंतर बारहाते यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहे. या फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू करण्यात आल्याचे अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी सांगितले.

मित्राकडून हात उसणे पैसे आणले

कौडगाव येथील मित्र नितिन झनझने याच्याकडून 2 महिन्यांपूर्वी घरगुती कामासाठी हात उसणे पैसे घेतले होते. तेच पैसे परत करण्यासाठी सासऱ्यांकडून 8 दिवसांपूर्वी 2 लाख 30 हजार रुपये घरी आणून ठेवले होते. हेच पैसे नितिन झनझने यांच्या नावाची स्लिप भरून बँकेत भरणा करत असताना चोरट्याने लांबवल्याचे रामेश्वर बारहाते यांनी सांगितले.