
अमरनाथ यात्रेला चाललेल्या भाविकांच्या चार बसेस एकमेकांवर आदळल्याने घटना समोर आली आहे. या अपघातात बसमधील 36 भाविक जखमी झाले आहेत. एका बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील चंदरकोट लंगर स्थळाजवळ शनिवारी सकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, पहलगामकडे जाणाऱ्या ताफ्यातील शेवटच्या बसचे ब्रेक निकामी झाले. यामुळे बसचे नियंत्रण सुटल्याने समोर उभ्या असलेल्या वाहनांवर धडकली. या धडकेत चार बसचे नुकसान झाले आणि एकूण 36 यात्रेकरू जखमी झाले. जखणी भाविकांना तात्काळ रामबन येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.