जम्मू कश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात ढगफुटी, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. किश्तवाडमध्ये नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर आता कठुआ जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे. रविवारी झालेल्या या ढगफुटीमुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर माहिती देताना सांगितले की कठुआतील ढगफुटीच्या घटनेबाबत त्यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. स्थानिक प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू असून एनडीआरएफच्या टीम्सही घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

अमित शहा यांनी या घटनेबाबत मोदी सरकारकडून शक्य ती सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

कठुआ जिल्ह्यातील घाटी आणि जंगलोत या गावांमध्ये ढगफुटी झाल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या पुराच्या लाटेत अनेक घरं कोसळली आहेत. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, इतकेच नव्हे तर कठुआ पोलिस ठाणेसुद्धा मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की राजबाग परिसरातील जॉड घाटी गावातही ढगफुटी झाली असून त्यामुळे गावाचा संपर्क इतर भागांपासून तुटला आहे. सध्या पोलिस व एसडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी उपस्थित आहेत आणि मदत व बचावकार्य सुरू आहे.