जम्मू-कश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा डाव उधळला, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

punjab border jawan

जम्मू-कश्मीरमध्ये एलओसी जवळील कुपवाडामध्ये हिंदुस्थानच्या सुरक्षा जवानांनी रविवारी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला आहे. दहशतवाद्यांची केरन सेक्टरच्या कुपवाडामध्ये संशयास्पद हालचाल दिसून आली होती. त्यानंतर जवानांनी घुसखोरांना रोखले. या दरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ही कारवाई अजूनही सुरू असून दहशतवाद्यांकडून अनेक शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात दहशतवादी हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेदरम्यान हे दहशतवादी हल्ले झाले. 8 जुलै 2024 रोजी, कठुआच्या बडनोटा भागात जोरदार सशस्त्र दहशतवाद्यांच्या गटाने गस्तीवर असलेल्या जवानांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये पाच जवान शहीद झाले होते आणि आठ जवान जखमी झाले होते.

जम्मू कश्मीरच्या राजौरीमध्ये हिंदुस्थानी जवानांच्या तळावर दहशतवादी हल्ला केल्याची घटना समोर आली होती. दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर तैनात असलेल्या जवानांवर गोळीबार केला, त्यात एक जवान जखमी झाला होता.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेचा भाग म्हणून सुरक्षा दल सातत्याने कारवाई करत आहेत. या अंतर्गत गेल्या आठवड्यामध्ये जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दोन ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 6 दहशतवादी मारले गेले. या चकमकीत दोन जवानही शहीद झाले होते.