जम्मू काश्मीरमधील माता वैष्णो देवीच्या यात्रेदरम्यान मोठा अपघात झाला आहे. माता वैष्णो देवीच्या यात्रेच्या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे दरड कोसळ्याची माहिती मिळत आहे. या अपघातात एका यात्रेकरूचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले.
माता वैष्णोदेवीच्या यात्रेच्या मार्गावर अचानक दरड कोसळल्याने प्रशासनाने देखील याची दखल घेतली आहे. यात्रेदरम्यान भाविकांनी सतर्क राहून आपल्या मार्गाची स्थिती लक्षात घेऊनच पुढे जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच या मार्गावर दरड कोसळल्याने येथील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांना मार्ग मोकळा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.