
जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सीमेपलीकडे आपल्या म्होरक्यांसोबत संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांनी लपवलेले एक सक्रिय ‘सॅटेलाईट कम्युनिकेशन डिव्हाईस’ सुरक्षा दलांना सापडले आहे. त्यामुळे आता दहशतवाद्यांची संपर्क यंत्रणा मोडकळीस येणार आहे.
सीमा सुरक्षा दल आणि जम्मू-कश्मीर पोलिसांच्या विशेष दलाने जम्मूच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात शोधमोहीम राबवली. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या मोहिमेत तांत्रिक उपकरणांचा शोध घेण्यात आला. त्या वेळी हे सॅटेलाईट उपकरण सापडले. जप्त केलेले उपकरण अतिशय प्रगत असून इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कशिवाय संवाद साधण्यासाठी त्याचा वापर होत होता. सीमेपलीकडे असलेल्या म्होरक्यांकडून दहशतवाद्यांना या उपकरणाच्या माध्यमातून सूचना मिळत होत्या.
उपकरणाची फॉरेन्सिक तपासणी होणार
जप्त करण्यात आलेले उपकरण फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले आहे. त्यातील माहिती डिकोड करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यातून दहशतवाद्यांचे कट, त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.




























































