
लष्कराची जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरू आहे. किश्तवार जिल्ह्यातील चतरू भागात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. गेल्या 326 दिवसांपासून जम्मू-कश्मीरमधील दुर्गम प्रदेशात सुरू असलेल्या संयुक्त कारवाईत जैश कमांडर सैफुल्लासह सात दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने सोमवारी याची पुष्टी केली.
किश्तवारमधील कडक थंडी, पाऊस आणि बर्फाळ वातावरणातही लष्कराने हार मानली नाही. लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी एकत्रितपणे गुप्तचर नेटवर्कच्या आधारे या दहशतवाद्यांचा पाठलाग केला आणि अखेर चतरूमध्ये सर्व सात दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत एफपीव्ही ड्रोन, सॅटेलाइट इमेजरी आणि आरपीए/यूएव्ही सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.
गेल्या वर्षभरात, चतरूच्या घनदाट जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये डझनभराहून अधिक चकमकी झाल्या. संयुक्त दलांच्या करवाईमुळे दहशतवादी सतत त्यांचे ठिकाण बदलत होते. किश्तवार, दोडा, कठुआ आणि उधमपूर जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला. अखेर, सैफुल्लासह त्याच्या टोळीचा सुरक्षा दलांनी खात्मा केला. हा दहशतवादी नेटवर्कला एक मोठा धक्का आहे.


























































