लष्कराचे ऑपरेशन महादेव! पहलगाम हल्ल्यातील तीनही हल्लेखोरांचा सुरक्षा दलाकडून खात्मा

सुरक्षा दलांनी सोमवारी श्रीनगरच्या लिडवास भागात ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत मोठ्या कारवाईत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट)च्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ही कारवाई लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. या दहशतवाद्यांबाबतची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम राबवली. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात लश्कर-ए-तोयबाचा (LeT) टॉप कमांडर हाशिम मूसा याचाही समावेश आहे.

लिडवास हा श्रीनगरचा एक बाह्य आणि घनदाट जंगलाचा परिसर आहे. जो डोंगराळ मार्गाने त्रालला जोडतो. या भागात यापूर्वीही टीआरएफच्या दहशतवादी कारवायांचे वृत्त आले आहे. ही कारवाई लष्कराच्या चिनार कॉर्प्सकडून सुरू आहे. या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची पुष्टी करण्यात आली आहे. दाचिगाम जंगलाच्या वरच्या भागात सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त कारवाई अजूनही सुरू आहे. जानेवारीमध्येही टीआरएफचा एक अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी या भागात संशयास्पद हालचाली आढळल्या होत्या. त्यामुळे लष्कराने ही मोहीम हाती घेतली.

सोमवारी दाचीगाममध्ये शोध मोहिमेदरम्यान अचानक गोळीबार झाला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. यानंतर, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि कारवाईचा वेग वाढवला. सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की आणखी टीआरएफ दहशतवादी अजूनही जंगलात लपले असावेत. त्यामुळे अजूनही शोध मोहीम सुरू आहे. दाचीगाम जंगल टीआरएफचे मुख्य लपण्याचे ठिकाण मानले जाते. या गटाने अलिकडेच नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटाची जबाबदारी घेतली होती. त्यात एक सैनिक शहीद झाला होता आणि तीन जखमी झाले होते. स्थानिक प्रशासनाने या कारवाईमुळे लोकांना घरात राहण्याचे आणि परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. परिसरात सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे आणि अजूनही ही कारवाई सुरू आहे.

पहलगाम या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने “ऑपरेशन सिंदूर” सुरू केले. या अंतर्गत, पाकिस्तानमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर ‘अचूक’ हवाई हल्ले करण्यात आले. हे लपण्याचे ठिकाण बहावलपूर आणि मुरीदके सारख्या भागात होते, जे लष्कर सारख्या दहशतवादी संघटनांचे गड मानले जातात. या हल्ल्यांमध्ये अनेक उच्च दर्जाचे लक्ष्य मारले गेले आणि दहशत पसरवणारी पायाभूत सुविधा नष्ट करण्यात आली. आता लष्कराने ऑपरेशन महादेवद्वारे पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.