
जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. या कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. परिसरात आणखी दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळते. सैन्याकडून शुक्रवारी रात्रीपासून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसराला घेराव घातला आहे. परिसरात अद्याप चकमक सुरू आहे.
लष्कराने जारी केलेल्या निवेदनात चिनार कॉर्प्सने चकमकीला दुजोरा दिला आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकांनी एकत्रितपणे कारवाई सुरू केली.
सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना घटनास्थळी घेरण्यात आले. यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. लश्करचे काही दहशतवादी या भागात उपस्थित असल्याची शक्यता वाटत असल्याने लष्करालाने अद्याप ही कारवाई थांबवली नाही. परिसरात शोध मोहीमही सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त सैन्यही पाठवण्यात येत आहे.