
जम्मू आणि कश्मीरमध्ये दशहतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांविरोधात लष्कराची कारवाई सुरू आहे. लष्कराने कुपवाडा येथे ऑपरेशन पिंपल राबवत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कुपवाडा येथील केरन सेक्टरमध्ये दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शुक्रवारी या परिससरात संयुक्त कारवाई सुरू केली. लष्कराने या ऑपरेशनला ऑपरेशन पिंपल असे नाव दिले आहे. या कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांना परिसरात संशयास्पद दहशतवादी हालचाली दिसून आल्या. लष्कराने ताबडतोब दहशतवाद्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांनीही लष्करावर अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल लष्कराने केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
घटनास्थळावरून एक एम4 रायफल, दोन एम4 मॅगझिन, 70 एम4 राउंड, एक एके-47 रायफल, तीन एके-47 मॅगझिन, दोन ग्लॉक पिस्तूल, दोन ग्लॉक मॅगझिन, 40 ग्लॉक राउंड, तीन चिनी हँडग्रेनेड, दोन पाउच, पाकिस्तानी सिगारेटचे पॅकेट, पाकिस्तानी औषधे, सुकामेवा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.



























































