
बहुचर्चित जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणातील तिच्या प्रियकराला सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर मैत्रिणीची निर्दोष सुटका केली.
1 जानेवारी 2021 रोजी जान्हवीची निर्घृण हत्या झाली. यासाठी दोषी धरत जान्हवीचा प्रियकर श्री जोगधंकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर तिची बालमैत्रीण दिया पडलकरची निर्दोष सुटका केली. प्रदीप घरत यांच्यामार्फत सादर झालेले पुरावे ग्राह्य धरत या हत्येप्रकरणी जोगधंकरला अतिरिक्त सत्रन्यायाधीश सत्यनारायण नवांदर यांनी दोषी धरले.
लव्ह ट्रँगल
19 वर्षीय जान्हवी मानसशास्त्र शाखेची विद्यार्थिनी होती. जान्हवी व श्री यांच्यात प्रेमसंबंध होते. 31 डिसेंबर 2020 च्या पार्टीतील दिया व श्रीची जवळीक जान्हवीने बघितली. तिचा संताप झाला. यावरून त्यांच्यात भांडण झाले. दिया व श्रीने जान्हवीला अमानुष मारहाण केली. तिला टेरेसवरून पाचव्या मजल्यावर फरफटत आणले. तिला भिंतीवर आपटले. यात तिचा मृत्यू झाला, असा पोलिसांचा आरोप होता. जान्हवीच्या शरीरावर 48 जखमा असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले.
74 जणांची साक्ष
या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, मात्र न्यायवैद्यक अहवाल, पार्टीत असलेल्यांचे जबाब व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी जोगधंकर व दियाविरोधात 31 मार्च 2021 रोजी आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात 74 जणांची साक्ष नोंदवण्यात आली.





















































