‘मेरे संग संग’तून श्रीकृष्णांचे विचार देशविदेशात; जन्माष्टमीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा

पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवावर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे. देश-विदेशात सुमारे 2 लाख युवक ‘मेरे संग संग’ पथनाट्याचे सादरीकरण करून जन्माष्टमी साजरी करत आहेत. सातारा जिल्ह्यातही 26 ऑगस्टपर्यंत पथनाट्ये सादर केली जाणार आहेत.

श्री कृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्यांचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत म्हणून पांडुरंगशास्त्री आठवले यांनी युवकांना पथनाट्याची संकल्पना दिली. त्यांच्या कन्या आणि स्वाध्याय परिवाराची धुरा सांभाळणाऱ्या धनश्री तळवलकर यांच्या मार्गदर्शनाने पथनाट्याच्या माध्यमातून लाखो युवक देश-विदेशात हे विचार घेऊन जात आहेत.

यंदा देशभरातील 15 राज्यांत तसेच इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आखाती देश यांसारख्या विविध देशांतही युवकांची जवळपास 20 हजार पथके म्हणजे लाख युवक ‘मेरे संग संग’ या पथनाट्यातून सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त करत आहेत. विविध भाषांमधून ही पथनाट्ये दि. 17 ऑगस्टपासून सादर केली जात आहेत.

22 वर्षे निरंतर पथनाट्ये सुरू

आज जन्माष्टमी फक्त दहीहंडीची उंची, थर आणि त्यासाठी लाखोंची बक्षिसे इतक्यावरच सीमित झाली आहे. श्रीकृष्ण आणि त्यांचे विचार जन्माष्टमी उत्सवात कुठे दिसतच नाहीत. अशा विपरित काळात जन्माष्टमीनिमित्त सादर होणाऱ्या या पथनाट्यांचा हा प्रयोग गेली 22 वर्षे निरंतर सुरू आहे. ही पथनाट्ये सकारात्मक आणि रचनात्मक करण्याचा प्रयास करत असल्याचे धनश्री तळवलकर सांगतात.