
टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा व स्टार महिला क्रिकेटर स्मृती मानधना यांना ‘विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुमराला पुरुष विभागात, तर मानधनाला महिला विभागात सर्वोत्तम खेळाडू म्हणून जाहीर करण्यात आले. सर्वोत्तम टी-20 खेळाडूचा बहुमान वेस्ट इंडीजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पुरनला मिळाला.
‘विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर’ हा क्रिकेटमधील सर्वात जुना वैयक्तिक पुरस्कार होय. क्रिकेटसाठी वाहिलेल्या ‘विस्डन’ नियतकालिकाकडून 1889 पासून दरवर्षी या पुरस्कारांची यादी जाहीर केली जाते. या पुरस्कारासाठी गतवर्षीच्या कामगिरीच्या आधारे निवड केली जाते. कोणत्याच खेळाडूला दोन वेळा हा पुरस्कार दिला जात नाही. ‘विस्डन’चे संपादक लॉरेंथ बूथ यांनी जसप्रीत बुमराला ‘स्टार ऑफ दी इयर’ म्हणून संबोधले आहे. बुमरा हा गतवर्षी 20 हून कमी सरासरीने 200 कसोटी विकेट टिपणारा पहिला गोलंदाज ठरला होता. त्याने आतापर्यंत 45 कसोटींत 19.40 च्या सरासरीने 204 फलंदाज बाद केले आहेत.
मिचेल सॅण्टनरला सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान
न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सॅण्टनरला ‘विस्डन’ने सर्वोत्तम कामगिरीबद्दल सन्मानित केले. गतवर्षी हिंदुस्थान दौऱयावर पुणे कसोटीत 13 विकेट टिपल्याबद्दल ‘विस्डन’ने त्याच्या कामगिरीची दखल घेतली. न्यूझीलंडने तीन कसोटी सामन्यांची ही मालिका 3-0 फरकाने जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती.