
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 1 महिन्यापासून सातत्याने नवीन जलौघ दाखल होतच आहे. कमी-अधिक प्रमाणात येत असलेल्या या पाण्यामुळे उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी 29 वःन 78 वर पोहोचली आहे. सध्या नाथसागरात 4 हजार 192 क्युसेस याप्रमाणे पाणी येत असून, दोन्ही कालव्यांतून परभणी, जालना व बीड जिल्ह्यांतील खरीप पिकांसाठी 2 हजार 200 क्युसेसप्रमाणे जलविसर्ग केला जात आहे.
15 जूनपासून नाशिक, इगतपुरी व आहिल्यानगर भागांत पडलेल्या पावसाचे पाणी 19 पासून गोदावरी नदीच्या माध्यमातून जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयात येण्यास प्रारंभ झाला. वरच्या भागातील सर्वच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरली. काही धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.
नाशिक भागातील पावसाने विश्रांती घेतली असली तरीही गोदावरीपात्रातून पाण्याची आवक चालूच आहे. 1522 फूट जलसाठवण क्षमतेच्या या महाकाय प्रकल्पात शनिवारी 20 रोजी 1517.65 फूट पाणीपातळीची नोंद झाली आहे, अशी माहिती दगडी धरण उपविभागीय अभियंत्या श्रद्धा निंबाळकर यांनी दिली. धरणात उपलब्ध असलेल्या 2426.143 दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी वापरायोग्य पाणीसाठा 1688.0.37 दशलक्ष घनमीटर एवढा आहे.
या पार्श्वभूमीवर 16 पासून दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. 208 किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे 1 हजार 200 क्युसेसप्रमाणे विसर्ग सुरू असून, या पाण्याने माजलगाव धरण भरून घेतले जाणार आहे. त्यातून पुढे परभणी जिल्ह्यातील पिकांना कृषी सिंचन करण्यात येणार आहे. 132 किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्यातून 1 हजार क्युसेसचा जलविसर्ग सुरू करण्यात आला आहे. बीड व जालना जिल्ह्यांतील खरिपाच्या पिकांना याचा लाभमिळणार आहे. जवळपास महिनाभर हे दोन्ही कालवे चालू राहणार आहेत, अशी माहिती दगडी धरण उपविभागीय शाखा अभियंता गणेश खरडकर यांनी दिली.