पराभव दिसायला लागल्यानंतर सर्वच लाडके व्हायला लागले, जयंत पाटील यांचा मिंधे सरकारला टोला 

लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर भविष्यातील पराभव डोळ्यासमोर दिसायला लागल्याने सरकारला सर्वच लाडके व्हायला लागलेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मिंधे सरकारला लगावला.

जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सरकारला दोन-तीन महिन्यांत सर्व निधीचे वाटप करायचे आहे. इतक्या शॉर्ट टर्ममध्ये लाडकी बहिण उपक्रम राबवायचा आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात त्यांना कोणी लाडके वाटत नव्हते, असे जयंत पाटील म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आम्हाला जागा वाटपापेक्षा महाविकास आघाडीचे यश जास्त महत्त्वाचे आहे. मुंबईतही आम्ही चांगल्या जागा लढवणार आहोत. मात्र किती लढवणार हे सध्या सांगणार नाही. नवीन चेहऱ्यांना सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वात जास्त पसंती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून नवीन चेहरे निवडून आलेले दिसतील, असे जयंत पाटील म्हणाले.