राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार घालविण्यासाठी एकसंघ काम करा!जयंत पाटील यांचे आवाहन

सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी व्यवस्था करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. त्यामुळे राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम करावे, असे आवाहनही केले.

गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिरकणी महोत्सव, नारीशक्ती मेळावा व कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी डॉ. नंदा कुपेकर-बाभुळकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर उपस्थित होत्या.

जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीकडे साधनसंपत्ती मर्यादित असली तरी राज्यातील जनतेचा आशीर्वाद आमच्याकडे आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही नक्की यशस्वी होऊ. चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकास हेच आमचे ध्येय आहे. शरद पवार यांना दगा दिलेल्या लोकांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी एकसंघपणे ताकद उभी करा. राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी महिलांसह महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकसंघपणे प्रचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न व विविध कामांत झालेला भ्रष्टाचार ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांनी हे सरकार बदलण्यासाठी पावले पुढे टाकण्याची गरज आहे. सिंधुदुर्गातील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील सरकारचा पूर्ण कारभारच चव्हाटय़ावर आला आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी डॉ. सौ. नंदा कुपेकर-बाभुळकर, माजी सभापती अमर चव्हाण यांची भाषणे झाली.

यावेळी माजी जि. प. सदस्य शिवप्रसाद तेली, जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, बाळासाहेब कुपेकर, दीपा पाटील, सुश्रुत बाभुळकर, शिवाजीराव खोत, अनिल घाटगे, मुकुंदराव देसाई, शिवाजीराव माने, चंदगड तालुका अध्यक्ष शिवाजीराव सावंत, शिवानंद माळी, रूपा खांडेकर, उदय चव्हाण उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक रामराजे कुपेकर यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले.

प्रारंभी हिरकणी महोत्सव पार पडला. या महोत्सवात अभिनेता ऋषिकेश शेलार, अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री प्रधान यांनी महिलांशी संवाद साधला.