
ओदिशाची राजधानी भुवनेश्वर येथे ईडीने 2 ठिकाणी टाकलेल्या धाडीत मोठा खजिना सापडला. एएमपीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शक्तिरंजन दास यांच्या घरी आणि त्यांच्या पंपन्या अनमोल माइन्स प्रायव्हेट लिमिटेड, अनमोल रिसोर्सेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली. देशातील बँक फ्रॉड प्रकरणातील एक इंडियन टेक्नोमॅक पंपनी लिमिटेडशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात ईडीने तब्बल 310 कोटींची संपत्ती जप्त केली.
कंपनी आणि कंपनीच्या संचालकांनी 2009 ते 2013 या कालावधीत बँकांकडून जवळपास 1 हजार 396 कोटी कर्ज बोगस कागदपत्रांच्या आधारे घेतले होते. ही रक्कम शेल पंपन्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी वळती करण्यात आली होती. छापेमारीत कोट्यवधींचे दागिने, पोर्शे आणि बीएमडब्ल्यूसारख्या 10 लग्झरी कार जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या 310 कोटींपैकी 289 कोटी रुपये एप्रिलमध्ये बँकांना परत करण्यात आले. चौकशीत आयटीसीओएलने शेल कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 59.80 कोटी रुपये ओदिशातील अनमोल माइन्स प्रायव्हेट लिमिटेड पंपनीत वळते केल्याचे समोर आले. एएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक शक्तिरंजन दास यांनी आयटीसीओएलचे प्रमोटर राकेश कुमार शर्मा यांच्या मदतीने बँक कर्जाची रक्कम मायनिंग बिझनेससाठी वापरली. काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला, असा ईडीचा आरोप आहे.
धाडीत 7 कोटींहून अधिक किमतीच्या 10 लक्झरी कार, 3 सुपरबाइक्स, पोर्शे केयेन, मर्सिडीज बेंज जीएलसी, बीएमडब्ल्यू एक्स 7, ऑडी ए 3, होंडा गोल्ड विंग बाइकसह इतर गोष्टी जप्त केल्या. याशिवाय 1.12 कोटी किमतीचे दागिने, 13 लाखांची रोकड, जमिनीचे कागदपत्र, 2 लॉकरही ताब्यात घेण्यात आले.