झारखंडमध्ये भाजपला बसणार धक्का, झामुमो-काँग्रेस आघाडीला मिळणार सत्ता

971

नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून देशभरात असंतोषाचा वणवा पेटलेला असताना 5 टप्प्यांत पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोटा धक्का बसणार असल्याचे संकेत सर्वच एक्झीट पोल्सच्या अंदाजातून देण्यात आले आहेत. निवडणुकीनंतरचे हे अंदाज खरे ठरले तर झारखंडमध्ये सत्तांतर सरळ आहे. विशेष म्हणजे एकाही पोलमध्ये भाजपला निवडणुकीत बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आलेली नाही. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा (झामूमो), राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांची आघाडी बाजी मारणार असे भविष्य सर्वच पोल्समध्ये वर्तविण्यात आले आहे.

आयएएनएस-सी व्होटर-एबीपी एक्झीट पोल्सच्या अंदाजानुसार झारखंड निवडणुकीत झामूमोच्या नेतृत्वातील आघाडी 31 ते 39 जागा जिंकू शकतील तर भाजपला 28 ते 38 जागांपर्यंतच मजल मारता येणार आहे. 81 जागांच्या झारखंड विधासनभेत सत्तेसाठीच्या बहुमताचा आकडा (मॅजिक फिगर) 41 आहे.

इंडिया टुडे ऑक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार झारखंडमध्ये झामूमो-काँग्रेस आघाडीचे साकार सत्तेवर येण्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. ‘एक्झीट माय इंडिया’च्या सर्वेक्षणानुसार भाजपला 22 ते 32, झामूमो आघाडीला 38 ते 50, झारखंड विकास मोर्चाला 2 ते 4, एजे एसमुला 3 ते 5 आणि अन्य गटांना अथवा अपक्षांना 4 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. टाईम्स नाऊच्या एक्झीट पोलनुसार झारखंडमध्ये भाजपला 28 तर झामूमो-राजद-काँग्रेस आघाडीला 44 जागा मिळणार असे सांगण्यात येत आहे.

मतांच्या सरासरीतही झामुमो आघाडी पुढे राहणार
इंडिया टुडे-एक्झिस माय इंडियाच्या पोलनुसार राज्यात भाजपविरोधी लाट दिसून येत असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. निवडणुकीत भाजपला 34 टक्के तर झामुमो-काँग्रेस आघाडीला 38 टक्के मते मिळतील असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या