
बंद असलेल्या कोळसा खाणीत बेकायदेशीर उत्खनन करताना मोठी दुर्घटना शनिवारी घडली. उत्खनन सुरू असताना खाणीचा एक भाग कोसळल्याने चार कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. झारखंडमधील रामगढ जिल्ह्यात ही घटना घडली.
सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड (सीसीएल) च्या बंद खाणीत बेकायदेशीर उत्खनन करताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे, असे रामगढचे एसडीपीओ परमेश्वर प्रसाद यांनी सांगितले.