शिक्षणात मुलांपेक्षा मुलींचा टक्का वाढला 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडून दिले. त्यांनी महिलांसाठी लावलेला हा शिक्षणाचा वेलू आता गगनावरी गेला आहे. दिवसेंदिवस शिक्षणात मुलींचा टक्का वाढत असून, गळतीचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र, त्याचवेळी मुलांचा टक्का कमी होत आहे. सांगली जिल्ह्यात शिक्षण घेत असलेल्या पावणेपाच लाख विद्यार्थ्यांपैकी जवळपास निम्म्या मुली आहेत.

पुण्यात सन 1848 मध्ये समाज सुधारक फुले दाम्पत्याने भिडे वाडय़ात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या घटनेला पावणेदोनशे वर्षांचा कालावधी लोटला आहे. एका वाडय़ात सुरू झालेल्या या शाळेपासून शिक्षणाची गंगा महिलांपर्यंत पोहोचली आणि आज तिचा प्रवाह वेगवेगळी क्षेत्रे काबीज करत वेगाने पुढे सरकत आहे. आज देशभरात मुलींसाठी स्वतंत्र शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे उभारली गेली आहेत. या माध्यमातून मुली उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांतील शिखरे काबीज करत आहेत.

एकूण विद्यार्थ्यांमध्ये 47 टक्के मुली

सांगली जिल्ह्यात सन 2024-25च्या आकडेवारीनुसार पहिली ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 4 लाख 78 हजार 479 इतकी असून, यामध्ये मुलींची संख्या दोन लाख 26 हजार 126 म्हणजेच 47.26 टक्के इतकी आहे, तर मुलींच्या गळतीचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे. ग्रामीण भागातही गावात शिक्षणाची गंगा पोहोचल्याने मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुली झाले आहेत. शिवाय मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकारने त्यांच्यासाठी मोफत शिक्षण सुरू केले आहे. त्याचाही लाभ मुली घेत आहेत.

शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ

एकूण विद्यार्थी संख्या घटत असली तरी शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या मुलींची संख्या दरवर्षी वाढत निघाली आहे. त्याचवेळी दुसरीकडे मुलांची संख्या घटत आहे. सन 2018-19 मध्ये पहिली ते बारावीत शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या दोन लाख 34 हजार 445 इतकी होती. त्यावेळच्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही संख्या 46 टक्के होती, तर सन 2024-25 मध्ये मुलींची संख्या दोन लाख 26 हजार 126 इतकी आहे. यात मुलींची संख्या घटली असली तरी याच वर्षातील एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही संख्या 47.26 टक्के आहे. म्हणजे गेल्या सात वर्षांत शिक्षणात येणाऱ्या मुलींचा टक्का वाढल्याचे दिसते.

सात वर्षांत विद्यार्थी संख्येत घट 

एकीकडे मुलींचा शिक्षणातील टक्का हळूहळू वाढत असताना दुसरीकडे एकूण विद्यार्थी संख्येत घट दिसत आहे. गेल्या सात वर्षांत एकूण 31 हजार सात इतकी विद्यार्थी संख्या घटली आहे. लोकसंख्या नियंत्रणामुळे ही घट दिसत आहे. यात मुलांची संख्या 22 हजार 688 इतकी मोठय़ा प्रमाणात घेतली आहे, तर मुलींची संख्या 8319 इतकी घटली आहे.

गेल्या सात वर्षांतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या

(मुलींची टक्केवारी)

वर्ष   मुले    मुली   टक्केवारी

18-19 275041      234445    46.00

19-20 268495      232068    46.36

20-21 264517      231613    46.68

21-22 267606      234670    46.72

22-23 257976      227740    46.89

23-24 257783      229047    47.05

24-25 252335      226126    47.26

गळती घटली

शिक्षणाच्या प्रवाहात आल्यानंतर मध्येच शिक्षण सोडून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही घट होत आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांची गळती कमी होत आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार पाचवी आणि आठवीत गळतीचे प्रमाण पाहिले जाते. त्यानुसार सन 24-25 मध्ये पाचवीत गळती होणाऱ्या मुलींची संख्या 0.90 टक्के होती, तर आठवीत गळतीचे प्रमाण 0.70 टक्के होते. म्हणजेच गळतीचे प्रमाणही एक टक्क्यापेक्षा कमी झाले आहे. सन 22-23 आणि 23-24 मध्ये पाचवीत गळतीचे प्रमाण जास्त नोंदले गेले आहे.