जिओचा आयपीओ पुढच्या वर्षी येणार, रिलायन्स इंटेलिजेंस नवीन कंपनी बनवणार; वार्षिक बैठकीत मोठय़ा घोषणा

रिलायन्सचा जिओचा आयपीओ पुढील वर्षी जूनमध्ये येणार आहे, अशी मोठी घोषणा मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी केली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 48 व्या सर्वसाधारण सभेत त्यांनी ही घोषणा केली असून आणखी काही मोठय़ा घोषणा केल्या आहेत. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट बिझनेस ही रिलायन्स इंडस्ट्रीजची थेट उपकंपनी बनवली जाणार असून रिलायन्स इंटेलिजेंस या पूर्ण मालकीच्या कंपनीची निर्मिती मुकेश अंबानीकडून जाहीर करण्यात आली. या वार्षिक बैठकीत रिया-कंटेटवरील व्हाइस सर्च, व्हाईस प्रिंट- हिंदुस्थानी भाषांमध्ये एआय डबिंग प्लस लिप सिंक, जिओलेन्झ- वैयक्तिकपणे पाहण्याचे पर्याय, मॅक्सह्यू 3.0 – मल्टी अँगल, विविध भाषा इमर्सिव्ह क्रिकेट अनुभव हे नवीन लाँच करण्यात आले. जिओने आपल्या वार्षिक सभेत बोलताना ज्या कामगिरी बजावल्या आहेत त्याचा उल्लेख केला. जिओने हिंदुस्थानात व्हाइस कॉल मोफत केले. मोबाईलवर व्हिडीओ पाहण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट करण्याची सवय निर्माण केली. जिओने आधार, यूपीआय, जनधन, डायरेक्ट बँक ट्रान्सफर यासारख्या सुविधांचा पाया रचला. 100 हून अधिक युनिकॉर्न कंपन्यांसह जिओने तिसऱया क्रमांकाची मोठी स्टार्टअप इकोसिस्टम तयार करण्यास मदत केल्याचे सांगितले.

वार्षिक नफा 25 टक्क्यांनी वाढला

जिओचा नफा आर्थिक वर्ष 2025 मध्ये तब्बल 25 टक्क्यांनी वाढून तो 5 हजार 698 कोटी रुपयांवरून 7 हजार 110 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत महसूल 18.8 टक्के वाढून 34,548 कोटी रुपये होता, तो आता 41 हजार 054 कोटी रुपये झाला. पहिल्या तिमाहीत कंपनीचा सरासरी महसूल 181.7 वरून 15 टक्क्यांनी वाढून 208.8 झाला.

ग्राहकांची संख्या 50 कोटींवर

रिलायन्स जिओने या बैठकीत सांगितले की, जिओ ग्राहकांची संख्या 50 कोटींपर्यंत पोहोचली आहे. शेअरधारक आणि ग्राहक यांच्यामुळे हे शक्य झाल्याचे मुकेश अंबानी यांनी आपल्या भाषणात म्हटले. जिओने काही अविश्वसनीय काम केले आहे. व्हाईस कॉल मोफत करणे, डिजिटल पे, आधार, यूपीआय, जनधन यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये बदल करणे हे काम जिओमुळे शक्य झाले आहे.