आयटी कंपनी बंद; 400 फ्रेशर्स रस्त्यावर, हिंजवडीत नोकरीच्या आमिषाने घातला कोट्यवधींचा गंडा

हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये एका आयटी कंपनीने नोकरी देण्याच्या आमिषाने तब्बल 400 फ्रेशर्सना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ही कंपनी आता बंद झाल्याने हे शेकडो फ्रेशर्स रस्त्यावर आले आहेत. या नवीन उमेदवारांना सशुल्क प्रशिक्षण आणि हमखास नोकरी देण्याचे आमिष कंपनीने दिले होते.

या कंपनीने आयटी क्षेत्रातील नवीन उमेदवारांना दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी 1 ते 3 लाख रुपये शुल्क आकारले. प्रशिक्षणानंतर पुढील दोन महिन्यांसाठी 15 हजार रुपये प्रतिमहिना मानधन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रोजेक्ट अलोकेशनच्या नावाखाली 3 ते 4 लाख रुपये वार्षिक पगार निश्चित असल्याचे उमेदवारांना सांगण्यात आले. या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे प्रशिक्षण आणि दोन महिन्यांचे मानधन मिळाले, परंतु त्यानंतरच्या चार महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. तसेच अनेक जण कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करत होते. तरीही वेतन देण्यात आले नाही. कंपनीचे कार्यालय बहुतेक वेळा बंद असते. कंपनीच्या मनुष्यबळ विभागाकडे चौकशी केली असता कंपनीकडून उलट पोलिसांना बोलावण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

पेड प्लेसमेंटच्या जाळय़ात अडकू नका

पेड प्लेसमेंटच्या जाळय़ात अडकू नका, मोठी रक्कम भरण्यापूर्वी कंपनीचा इतिहास, रिह्यू आणि आर्थिक स्थिती तपासा, पगार न देता कंपनी बंद करणे हा कामगार वाद नसून थेट फसवणुकीचा गुन्हा आहे, असा इशारा आयटी फोरमने दिला आहे. दरम्यान, आयटी क्षेत्रात रोजगार कपातीचे वारे सुरू आहेत. अनेक बडय़ा कंपन्यांनी मनुष्यबळ कपातीचे धोरण स्वीकारले असून आयटी क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने नुकतीच 12 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती.