राज्यभरात मिंधे सरकारविरोधात जोडे मारा, मालवणातील शिवराय पुतळा दुर्घटनेवरून संतापाची लाट

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे राज्यभरात शिवप्रेमींमध्ये सरकारविरुद्ध तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात विविध ठिकाणी आज ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्राची अस्मिता धुळीस
महाविकास आघाडीतर्फे पुण्यातील कॅम्प येथील कोहिनूर चौकात सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. या वेळी निकृष्ट बांधकाम करून भाजप सरकारने महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवल्याची टीका आंदोलकांकडून करण्यात आली. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात आमदार रवींद्र धंगेकर, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अॅड. अभय छाजेड, आबा बागुल, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, दत्ता बहिरट, अविनाश बागवे आदींसह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

लोणावळय़ात आंदोलन
राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या निषेधार्थ लोणावळय़ात महाविकास आघाडीतर्फे ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पह्टो असलेल्या बॅनरला जोडे मारून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी शिवसेना पक्षाचे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, मावळ तालुकाप्रमुख आशीष ठोंबरे, काँग्रेस सचिव निखिल कविश्वर, राष्ट्रवादीचे दत्तात्रय पडवळ आदी उपस्थित होते.

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
येथे महाविकास आघाडी आणि स्वराज्य सेवा संघातर्फे ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. शिवशाहीर सुरेश सूर्यवंशी उर्फ असंगिकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी पोवाडा सादर केला. यावेळी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख अभिजित जगताप, शहरप्रमुख राजेंद्र जगताप, नीलेश गिरमे, संतोष भोंगळे, दीपक जगताप, मंगेश जगताप, सुरेश कामठे, संतोष भोसले, महिला आघाडीच्या तालुका संघटिका प्रियंका सुकल आदी यावेळी उपस्थित होते.

बदलापुरात निदर्शने
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे रविवारी महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध व्यक्त करत जोडे मारो आंदोलन केल्यानंतर आज बदलापुरातील महाविकास आघाडीनेदेखील खोके सरकारच्या विरोधात शिवरायांच्या पुतळ य़ासमोर निदर्शने केली. शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख किशोर पाटील व काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे, सरचिणीस अविनाश देशमुख, काँग्रेस कामगार नेते दादासाहेब पाटील उपस्थित होते.

नगरमध्ये भ्रष्ट सरकारविरोधात संताप
मालवण येथे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्ट बांधकाम आणि भ्रष्टाचारामुळे कोसळल्याच्या घटनेचा शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप आहे. याला सरकार जबाबदार असल्यामुळे ठिकठिकाणी भ्रष्ट ‘सरकारला जोडे मारा’ आंदोलन करण्यात येत आहे. नगरमध्ये दिल्ली गेट येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोपरगावात आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कोपरगावात महाविकास आघाडीने ‘जोडे मारा’ आंदोलन केले. यावेळी शिवसेना पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अॅड. संदीप वर्पे, काँगेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे, तुषार पोटे आदी उपस्थित होते.