
पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अजूनही संथगतीनेच सुरू आहे. पहिला टप्पा जून 2026 मध्ये सुरू करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते, मात्र कामाची संथगती लक्षात घेता पहिल्या टप्प्याची जूनची डेडलाईन हुकण्याची चिन्हे आहेत.
‘अमृत भारत स्थानक विकास योजनें’तर्गत जोगेश्वरी टर्मिनसचा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. सुरुवातीला डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु पंत्राट आणि जागेसंबंधीच्या अडचणींमुळे प्रकल्पाची सातत्याने रखडपट्टी झाली आहे. मागील तीन वर्षांत रेल्वे प्रशासनाने वारंवार नवनव्या ‘डेडलाईन’ जाहीर केल्या. त्यानंतरही कामाला गती मिळालेली नाही. अजून प्लॅटफॉर्म, ट्रकचे काम पूर्ण झालेले नाही. पहिल्या टप्प्यातील ही रखडपट्टी संपूर्ण प्रकल्पाच्या मार्च 2027 च्या डेडलाईनवर परिणाम करणार असल्याची चिन्हे आहेत. प्रकल्पावर जवळपास 76.48 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र प्रकल्पाची आणखी रखडपट्टी झाल्यास खर्च वाढू शकतो, असे मत बांधकाम क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले.
निवडणुकांवेळी घोषणा, मग नंतर दुर्लक्ष का?
निवडणूक काळात सत्ताधाऱयांकडून मोठमोठय़ा प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या, मात्र नंतर प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याकडे दुर्लक्ष केले. जोगेश्वरी टर्मिनस प्रकल्पाचे काम रखडल्यामुळे खर्च वाढतोय. त्या खर्चाचा भार सामान्य प्रवाशांवरच पडणार आहे. याला सरकार जबाबदार असल्याचे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष राजेश पंडय़ा यांनी सांगितले.





















































