नागवडे कुटुंबीयांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण

723

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे भाजपचीच सत्ता आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणात नागवडे कुटुंबीय चुकीच्या गाडीत बसले होते, आता आमच्या गाडीत बसा तुम्हाला कारखाना, नगरपालिका, घोड-कुकडी आणि साकळाई पाणीप्रश्न सोडवण्यासह सर्व स्थरावर विखे कुटुंब तुमच्या पाठीशी उभे राहील. नागवडेंना श्रीगोंदयात सत्तेवर बसविण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही देत खासदार डॉ. सुजय विखे यांनी नागवडेंना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले.

शनिवारी ढोकराई येथील प्रगती मंगल कार्यालयात नागवडे गटाच्या कार्यकर्त्यांच्या सहविचार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपस्थित राहत खा. विखे यांनी काँग्रेस नेत्या अनुराधा नागवडेंना उमेदवारी मागे घेऊन भाजप प्रवेश करण्याचे आवाहन केले. खा. विखे म्हणाले, आम्ही अनेकदा दिलेले शब्द पाळू शकलो नाहीत, मात्र स्व. शिवाजीराव नागवडेंनी राजकारणात नेहमीच शब्द प्रमाण मानला. श्रीगोंदयाच्या राजकारणात नागवडेंचा अनेकांनी स्वार्थासाठी वापर केला. विखे कुटुंबाच्या शब्दावर विश्वास ठेवून निर्णय घ्या. तालुक्यात व्यक्तीला  नव्हे तर भाजप पक्षाला सहकार्य करा,  असे आवाहन करीत नागवडेंना श्रीगोंदयाच्या सत्तास्थानी बसविण्याची जबाबदारी माझी, असे आश्वासन खासदार सुजय विखे यांनी दिले.

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली होती. माजीमंत्री हर्षवर्धन पाटील आणि खा. विखे यांच्या मदतीने भाजपकडे देखील उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र आजही विखे कुटुंबाने साथ दिल्यास १५ दिवसात नागवडे कार्यकर्त्यांच्या बळावर आमदार होतील.  इथून पुढच्या काळात आमच्याबरोबर जे येतील त्यांना सर्वोतोपरी ताकद देण्याचे काम करू. माजी मंत्री पाचपुतेंशी आमचे कधीच जमले नाही, आणि भविष्यात देखील कधीच जमणार नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुजय विखे यांनी नगरपालिकेसाठी निधी, घोड, कुकडीसह साकळाईचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचा शब्द द्यावा. त्याचबरोबर उद्याच्या काळात नागवडे कुटुंबातील व्यक्तीला आमदारकी मिळवून देण्याची जबाबदारी खा. विखे यांनी घेतली तर आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ अन्यथा पूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणूक करू, असे प्रतिपादन नागवडे यांनी केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, प्रशांत गोरे, रामदास झेंडे, शिवाजी नलावडे, रमेश जाधव, उर्मिला काटे, नितीन वाबळे, रामभाऊ रायकर आदींनी भावना व्यक्त केल्या. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, दीपक नागवडे, बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे, सुरेश लोखंडे, बाळासाहेब नलगे, राजू गोरे, सतीश मखरे, नगरसेवक राजू लोखंडे, संतोष कोथिंबीरे, असिफ इनामदार आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या