लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची दाणादाण उडवत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला. या यशानंतर उद्या दुपारी दोन वाजता मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्र येथे महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संबोधित करणार आहेत. राजकीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या अशा या पत्रकार परिषदेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांची महाविकास आघाडी आणि भाजप, शिंदे गट, अजित पवार गट यांची महायुती यांच्यात थेट सामना झाला. या लढाईत भक्कम एकजूट दाखवत महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकून महायुतीचा धुक्वा उडवला. महाराष्ट्रातील जनतेने फोडाफोडीचे राजकारण करणाऱया भाजपला आणि सत्तेसाठी गद्दारी करणाऱया मिंधे व दादा गटाला हिसका दाखवला. त्यानंतर महाविकास आघाडी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होत असून या पार्श्वभूमीवर उद्याची पत्रकार परिषद महत्त्वाची ठरणार आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित राहणार आहेत.
– राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होत आहे. सध्याच्या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल. त्याचवेळी शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून येत्या चार महिन्यांत विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या सगळ्याबाबत पत्रकार परिषद आटोपल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांत चर्चा होण्याची शक्यता आहे.