
दिल्लीहून लखनौला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात सोमवारी रात्री एका उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना देण्यात आलेल्या जेवणात बुरशी आढळल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांनी आक्षेप नोंदवला असता, विमानातील केबिन क्रूने त्यांच्याशी कथितरीत्या गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही घटना चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे लँडिंग झाल्यानंतर उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती प्रशांत कुमार हे एअर इंडियाच्या एआय 1720 या विमानाने दिल्लीहून लखनौचा प्रवास करत होते. रात्री सुमारे 9 वाजून 40 मिनीटांनी लखनौला पोहोचलेल्या या विमानात ते 1ए या आसनावर बसले होते. प्रवासादरम्यान त्यांना देण्यात आलेल्या जेवणात बुरशी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी यावर आक्षेप घेतला असता, केबिन क्रू सदस्य मनप्रीत आणि प्रीती यांनी ही समस्या सोडवण्याऐवजी न्यायमूर्तींशी उद्धटपणे संवाद साधला. इतकेच नव्हे तर, एअर इंडियाचा ग्राहक सेवा कर्मचारी सुफियान यानेही त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दूषित अन्नाचे नमुने पुराव्यासाठी विमानातून बाहेर नेण्यासही कर्मचाऱ्यांनी मज्जाव करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत न्यायमूर्तींसोबत असलेले सुमित गुप्ता यांनी स्थानिक पोलिसांकडे एअरलाइन कर्मचाऱ्यांविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे आणि त्यांच्या हक्कांकडे एअर इंडियाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. कृष्णा नगरचे एसीपी रजनीश वर्मा यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, प्राप्त तक्रारीच्या आधारे संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.


























































