बालनाट्य : जंगल बुक द ट्रेझर

सामना प्रतिनिधी । मुंबई

सध्या बालनाटय़ात विविध प्रयोग होत आहेत. जंगलबुक द ट्रेझर हे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

परदेशी बालनाटय़ांवर आधारित ‘जंगल बुक द ट्रेझर’ हे मराठी बालनाटय़ ९ जून रोजी शिवाजी मंदिर येथे सादर होत आहे. काल्पनिक कथांद्वारे मुले आणि पालकांना सकारात्मक संदेश  क्रिश, स्पायडर मॅन, मोगली आणि सिंघम या पात्रांच्या माध्यमातून दिला जाणार आहे. शिवाय परीराज्यातील आल्हाददायी सफर, जादुई, अद्भुत, चमत्कारीक अशा अनेक प्रसंगांचा थरार जंगल बुकच्या माध्यमातून मुलांना अनुभवता येईल. तसेच याच वैशिष्टय़ असं की, हे नाटक फक्त सुट्टीपुरतं मर्यादित राहणार नसून मुलांना वर्षभर पाहता येणार आहे.

आपल्या आगळ्यावेगळ्या बालनाटय़ाविषयी या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक रमेश वारंग सांगतात, काल्पनिक कथेवर आधारित हे बालनाटय़ आहे. यासाठी मी युटय़ुबद्वारे परदेशी बालनाटय़े पाहिली. त्यांचा अभ्यास केला. आंतरराष्ट्रीय नाटकांतील भव्य व्यासपीठ रचना, पात्रांचे पोषाख, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग, जादूचे प्रयोग हे वेगळेपण आपल्याकडील बालनाटय़ात सादर करण्याच्या अनुषंगाने ‘जंगल बुक द ट्रेझर’ हे बालनाटय़ लिहिले आहे. मुलांनी प्रत्यक्ष रंगमंचावर कधीही न पाहिलेली थरारक दृष्ये चेटकीण आणि राक्षस यांच्या माध्यमातून या कथानकात बालप्रेक्षकांच्या भेटीला आणली आहेत.

प्रत्येक बालनाटय़ातून अनोखा संदेश मुलांपर्यंत पोहोचवण्याचा वारंग यांचा प्रयत्न असतो. या नाटकामधून प्रत्येक प्रसंगातून एक वेगळा सकारात्मक संदेश मुलांना दिला जाणार आहे.  एखादी घटना संकट वाटत असली तरी त्यामुळेच आपल्याला पुढे जायला मदत होते. अधूनमधून बालप्रेक्षकांना थ्रीडीचाही अनुभव घेता येईल. बालप्रेक्षकांना खळखळून हसवत, त्यांना या अदभुत नवनिर्मितीचा आनंद देण्याबरोबरच या नाटकातून मोबाईलचा योग्य तो वापर करा, भाजीपाला खा, आई-वडिलांना मदत करा, त्यांची सेवा करा असे अनेक संस्कारक्षम संदेश आणि मराठीचं महत्त्व  या नाटकातून देण्यात आले आहे. या बालनाटय़ाचे मराठीबरोबरच हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रयोग सादर करण्याचा निर्माते मोहन चोरघे आणि प्रीती चोरघे यांचा मानस आहे.