बारावीच्या 50 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना; बहिष्कार आंदोलनावर शिक्षक ठाम

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला असून आतापर्यंत पार पडलेल्या इंग्रजी, मराठी, हिंदी (इतर भाषा विषय) वाणिज्य संघटन आणि भौतिकशास्त्र्ा या विषयांच्या उत्तरपत्रिकांची तपासणीच झालेली नाही. राज्यातील विविध महाविद्यालयांत, मुख्य परीक्षाकेंद्रांवर तब्बल 50 लाख उत्तरपत्रिका तपासणीविनाच पडून आहेत. राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त शिक्षकांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे सरकारकडून मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवरील आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने घेतला आहे.

उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार टाकला असून आज या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. आतापर्यंत बारावीच्या सुमारे 50 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. एकही उत्तरपत्रिका अद्याप तपासली गेली नाही. तसेच सर्व विषयांच्या मुख्य नियामकांनी बहिष्कारात सहभागी असल्याचे निवेदन राज्य मंडळाकडे सादर केले आहे. आज बारावी विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्र्ा विषयाच्या मुख्य नियामकांनी बहिष्कारात सहभागी असल्याचे निवेदन राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांना दिले. राज्यातील नऊही विभागीय मंडळात बहिष्कारामुळे नियामकांची सभा झाली नाही.

राज्य सरकारने राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाशी चर्चा केली त्याला आता आठवडा होत आहे पण अद्यापही शालेय शिक्षण विभागाकडून इतिवृत्त मिळत नसल्याची खंत महासंघाने व्यक्त केली आहे. शिक्षण खाते या बहिष्कार आंदोलनांकडे गांभीर्याने बघत नसल्याचे संघटनेचे संघटक मुकुंद आंधळकर यांनी सांगितले. बहिष्कार लांबला तर बारावीचे निकाल वेळेवर लागणार नाहीत व त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना मुकावे लागेल. बैठकीत शिक्षकांच्या काही मागण्यांसंदर्भात ठोस निर्णयाचे इतिवृत्त मिळाल्यानंतर महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय घेण्यात असल्याचे आंधळकर म्हणाले.