जसा सीमेवर गावचा रखवालदार तसाच शिवसेनेचा शाखाप्रमुख, आमदार भास्कर जाधवांचा शिवसेना शाखाप्रमुखांना कानमंत्र

जसा गावच्या सीमेवर गावचा रखवालदार असतो.तसाच प्रत्येक गावात एक शाखाप्रमुख असतो. तो आक्रमक असतो,अभ्यासू असतो, तो निष्ठावान असतो तो निर्भिड असतो अशा गावाच्या सीमेत विरोधकांना शिरकाव करता येत नाही. शाखा ही शिवसेनेची जीवनवाहिनी आहे आणि शाखाप्रमुख ही संघटनेची खरी ताकद आहे असे उद्गार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी काढले. ते चिपळूणमधील बांदल हायस्कूल येथे आयोजित केलेल्या शाखाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते.

शाखाप्रमुखांची कर्तव्य आणि जबाबदारी काय याची माहिती देताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, जेव्हा विद्यार्थ्यांची पुस्तके आणि वह्या घेण्याची परिस्थिती नव्हती त्या काळात शिवसेनेच्या शाखाप्रमुखांनी वह्या पुस्तकांचे वाटप केले. वैद्यकीय शिबिरातून चष्म्यांचे वाटप केले त्यामधून जनतेची मनं जिंकली होती. आताही शाखाप्रमुखांनी अशीच कामे करून जनतेची मने जिंका. विधानसभा निवडणूकीत आपल्या महाविकास आघाडीचा पराभव झाला. जिल्ह्यात मी एकमेव आमदार निवडून आलो, पण माझंही मताधिक्य घटलं. मग मी याबाबत विचारमंथन केले.कुठे मतचोरी झाली. कुठे हक्काची मतं गायब केली. इव्हीएम घोटाळा केला. भरमसाठ पैसा वाटला. लाडकी बहिण सारख्या योजनेमुळे मतदानावर परिणाम झाला.हि सर्व कारणं आपण शोधली. शिवसेनेत सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे तर तो शाखाप्रमुख. म्हणून मी सर्वप्रथम गुहागरात शाखाप्रमुखांचा मेळावा आयोजित केला .कारण शाखाप्रमुख ही शिवसेनेची ताकद आहे. तोच शिवसेनेचे गतवैभव परत आणू शकतो असे आमदार जाधव अभिमानाने म्हणाले. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत आहेत. त्या आपण जिकांयच्या आहेत असा मूलमंत्र आमदार भास्कर जाधव यांनी शाखाप्रमुखांना दिला आहे.

यावेळी उपनेते व माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, महिला उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे, महिला क्षेत्राध्यक्षा रुमा देवळेकर, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, तालुका संघटक राजू देवळेकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख मानसी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका प्रमुख बळीराम गुजर यांच्या कामगिरीचे आमदार भास्कर जाधव विशेष कौतुक केले.