
मानवी मनाच्या गाभाऱयात दडलेल्या अंधाऱ्या कोपऱ्यांना प्रकाश दाखवणारा विलक्षण नाटय़ानुभव म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सादर करत असलेलं ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’. विठ्ठलभक्तीच्या पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन हे नाटक आजच्या धकाधकीच्या जीवनात हरवलेल्या माणसाचा आत्मशोध मांडतं.
‘प्रिय भाई – एक कविता हवी आहे’ आणि ‘कवी जातो तेव्हा’ या वेगळ्या वाटेवरच्या नाटकांनंतर प्रयोगशील द्वयी डॉ. समीर कुलकर्णी लिखित आणि अमित वझे दिग्दर्शित या कलाकृतीत सौदामिनी या स्त्राrच्या माध्यमातून प्रत्येकाच्या आत चाललेला संघर्ष उलगडला जातो. परदेशात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनंतर आयुष्य थांबलेल्या सौदामिनीला वारीच्या वाटेवर स्वत-चा ‘विठ्ठल’ सापडतो. भीती, राग, नैराश्य आणि एकटेपणाच्या गर्तेत अडकलेल्या माणसाला अंतर्मुख करणारा हा नाटय़ानुभव म्हणजे केवळ भक्तिगाथा नाही, तर स्वत-कडे नव्याने पाहायला भाग पाडणारी आध्यात्मिक यात्रा आहे. प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा असतो, पण तो शोधण्याची वाट हे नाटक दाखवतं. गजानन परांजपे, अंजली मराठे, निनाद सोलापूरकर आणि पार्थ उमराणी यांनीही मधुराणी प्रभुलकर यांना उत्तम साथ दिली आहे.





























































