
बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या कलावंत कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी आंतरविभागीय खात्यांतर्गत नाटय़ स्पर्धा भरवीत असते. यंदाचे या स्पर्धेचे 53 वे वर्ष होते. या वर्षी नायर धर्मादाय रुग्णालयाने सादर केलेले ‘कायाप्पाचा पाडा’ नाटक सर्वोत्कृष्ट ठरले. या व्यतिरिक्त नाटकाला आठ वैयक्तिक पारितोषिकेही मिळाली. अशा प्रकारे नायर नाटक मंडळाने आपली दमदार वाटचाल या वर्षीही कायम ठेवली.
‘कायाप्पाचा पाडा’ नाटक नायर रुग्णालयाचे कर्मचारी देवेंद्र काळसेकर यांनी लिहिले आहे. नाटकाचे दिग्दर्शन नम्रता काळसेकर यांनी केलेले आहे. यासाठी दिग्दर्शनाचे सर्वोत्कृष्ट द्वितीय पारितोषिक त्यांना प्राप्त झाले. याव्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम – मानसी जोशी, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – प्रथम- मिलिंद वाणी, सर्वोत्कृष्ट नेपथ्य- प्रथम – अमोल पाटील, सर्वोत्कृष्ट रंगभूषा- प्रथम – अश्विनी काळोख, सर्वोत्कृष्ट वेशभूषा- प्रथम- प्रियांका हातगे, अभिनय उत्तेजनार्थ नरेश कांबळे, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – द्वितीय – अजिंक्य पाचरकर आदी नायर रुग्णालयाच्या कर्मचाऱयांनी बाजी मारली.
नायर नाटक मंडळात अगदी कामगारांपासून क्लेरिकल स्टाफ, सिस्टर्स, नर्सेस, लॅब टेक्निशियन, डॉक्टर, असोसिएट प्रोफेसर ते अगदी विभागप्रमुख असे सर्व कर्मचारी एकत्रितपणे येऊन काम करतात. नाटक हे त्यांचे वेड आहे. मागील तीन-चार वर्षे नायर रुग्णालयातर्फे सादर झालेल्या नाटकांनी पारितोषिकप्राप्त कामगिरी केलेली आहे.