कलावंतीण दुर्ग; एक साहसी अनुभव

>> स्वप्नील साळसकर

निसर्गसौंदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ताठ मानेने उभा असलेला प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग. सुरुवातीला याला मुरंजनगड असे नाव होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे नाव बदलून कलावंतीण दुर्ग असे ठेवले. अगदी कोसो मैल दूरवरून समोरासमोर उभ्या ठाकलेल्या या दोन्ही गडांचे मनमोहक दृश्य मन प्रसन्न करते. पनवेल आणि कर्जतदरम्यान जुन्या मुंबई-पुणे मार्गावर ठाकूरवाडी गावातून कलावंतीण दुर्गाच्या पायथ्याशी पोहोचता येते.

रायगड जिह्यातील पनवेल तालुक्यात असणारा कलावंतीण दुर्ग म्हणजे श्वास रोखायला लावणारा सरळसोट पहाड. त्याच्याविषयी थोडीशी माहिती होती म्हणूनच दुर्गभ्रमंतीच्या निमित्ताने यावेळी तो ‘सर करण्यासाठी’ पावले पुढे पडली. मात्र त्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचायला दुपारचे दोन वाजले होते. थोडीशी पोटपूजा करून मग भर उन्हातून मजल दरमजल करत चाल सुरू केली. त्याचदरम्यान सडपातळ बांधा, पायात साधी स्लिपर, डोक्यावर भलीमोठी पिशवी घेऊन एक गृहस्थ तरातरा चालत होते. जणू ही वाट त्यांच्या पायाखालची होती. स्मितहास्य केल्यावर सहज विचारले, ‘‘तुम्ही इथले रहिवासी का?’’, तर त्यांनी होकार दिला. मग काय, विचारपूस सुरू झाली आणि आमच्या चालण्यालाही गती मिळाली.

कलावंतीण दुर्गाच्या हद्दीत वारदोली ही एक छोटी ग्रामपंचायत आहे. येथे जवळपास 30 ते 35 कुटुंबे राहतात. येणाऱया पर्यटकांना राहण्यासह वाजवी किमतीत अल्पोपाहारासह खानपान व्यवस्था उपलब्ध करून देणे, वर्षातून एकदा नाचणी, भातशेती यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. गिर्यारोहणामुळे तेथील लोकजीवन जवळून पाहता आले. आमचे वाटाडय़ा ठरलेल्या रामा भुतंबरा या गृहस्थांमुळे दुर्गाविषयी, शिवाय इतर परिसराची माहिती मिळाली. डोंगराळ भाग चढाई केल्यानंतर काही टप्प्यावर ग्रामस्थांनी उभारलेली पक्की घरी आहेत. त्याच ठिकाणी पर्यटकांची व्यवस्था होते. दुर्ग चढाई करताना मधील काही भागात विश्रांतीसाठी छोटय़ा मंडपाची व्यवस्था रहिवाशांनी केली आहे. त्याचदरम्यान दुर्ग उतरणारा प्रत्येक जण आम्हाला विचारत होता, ‘‘पोहोचाल का टोकापर्यंत?’’ त्यात दोघांनी आम्हाला आपल्या हातातील दोन काठय़ा दिल्या आणि त्याची गरज डोंगराळ भाग उतरणीच्या वेळी खऱया अर्थाने कळली. एकीकडे कलावंतीण दुर्गाचे टोक गाठण्याची इच्छा. कारण शेवटच्या टप्प्यात
असलेली दोरीची शिडी सायंकाळी पाच वाजता काढली जाते. त्यामुळे मध्येच चालण्याचा वेग वाढायचा, कधी पुन्हा दम लागल्यावर दोन मिनिटं थांबायचं आणि पुढे सरकत राहायचे. अखेर पहाडी भिंतीत कोरलेल्या पायऱया पार केल्या. छाती धडधडत होती, पण टोक गाठायचेच ही पण ईर्षा होती. थरथरणाऱया पायांनी शिडीची एक-एक पायरी चढू लागलो. याही ठिकाणी साधारण 60 वर्षीय गृहस्थ होते. त्यामुळे आत्मविश्वास अजून वाढला आणि ही दुर्ग मोहीम फत्ते झाली. मनात उत्साहाचा वारा जोरदारपणे फणफणू लागला. एकच जयघोष घुमला, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’’ टोकावरून माथेरान, चांदेरी, पेबदुर्ग, इर्शलगड, प्रबळगड, कर्नाळा किल्ला, पनवेल, नवी मुंबई शहराचा परिसर अगदी सहजपणे दिसतो. एक दिवसाची ही मोहीम पर्यटनाचा मनसोक्त आनंद देणारी ठरली.