कळसूबाई येथील पोहोच रस्त्यांच्या डागडुजीची मागणी, अंकीत प्रभूंनी दिले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना निवेदन

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसूबाई शिखराची ओळख आहे.  या शिखरावर पोहोचण्यासाठी कठीण कातळ टप्यांवर शिडया बसविल्या आहेत. यामुळे तीन ते चार तासात शिखर सर करणे सहज शक्य होते.  या शिडया अरुंद व तोकडया आहेत यामुळे ब-याच वेळा गर्दी होते.  पावसाळयात या शिडयांवरुन ये-जा करणे धोकादायक ठरू शकते.  यामुळे या शिडयांची रुंदी वाढवून मोठया आकाराच्या रुंद शिडया बसविणे गरजेचे असल्याची मागणी युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांनी केली आहे.

अंकित प्रभू यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेतली.  प्रभू यांनी आदित्य ठाकरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये शिखरावर जाण्यासाठीच्या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी पर्यावरण पूरक बायो-टॉयलेट बसवावी अशीही मागणी केली आहे. यामुळे  गिर्यारोहक, पर्यटकांची आणि विशेषतः महिला वर्गाची अडचण दूर होण्यास मदत होईल असं प्रभू यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मी इतकी आहे. हे शिखर सर करण्यासाठी महाराष्ट्रासह आजू-बाजूच्या राज्यातील गिर्यारोहक आणि पर्यटक मोठया संख्येने हजेरी लावतात.

आपली प्रतिक्रिया द्या