
वातानुकूलीत गारेगार प्रवासाचे गाजर दाखवणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन (केडीएमटी) सेवेने प्रत्यक्षात प्रवाशांचा पुरता भ्रमनिरास केला आहे. डोंबिवली आणि कल्याणमध्ये धावणाऱ्या केडीएमटीच्या अत्याधुनिक एसी बसेस अचानक गायब झाल्या असून ‘गारेगार’ प्रवास बंद झाला आहे. लायकी नसलेल्या कंपनीला बस बांधणीचे काम दिल्याने अवघ्या आठ गाड्या बनवतानाच कंपनीची दमछाक झाली असून बस बांधणीचे काम थांबले आहे. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा रिक्षाचालकांच्या लुटमारीचा सामना करावा लागत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन उपक्रमातून 207 इलेक्ट्रिक एसी बसेस खरेदी करण्यासाठी 99 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून केडीएमटीने कोसिस मोबिलिटी सर्व्हिसेस आणि बुथेलो प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंत्राटदारांची नियुक्ती करत त्यांच्या माध्यमातून मोठ्या मिडी आणि मिनी अशा 207 बसेसची खरेदी करून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
जर्मनी बनावटीच्या अत्याधुनिक युरो बसेस शहरात प्रवाशांना गारेगार सेवा देणार असल्याचे स्वप्न यावेळी परिवहन विभागाकडून दाखविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या कंपनीची बसेस निर्मितीची क्षमताच नसल्याने पहिल्या 10 बसेस बनवतानाच कंपनीला घाम फुटला. पुढील बसेस तयार करण्यास असमर्थता दाखवत कंपनीने कशाबशा आठ बसेस अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुरवल्या. कोसिस मोबिलिटी आणि बुथेलो प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांकडे एसी बसचा ठेका दिला, पण त्यांची तितकी निर्मिती क्षमता नसल्याने केडीएमटी प्रशासन पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहे.
स्पेअर पार्ट मिळत नसल्याने गाड्या डेपोत
जर्मनी बनावटीच्या युरो टेक्नॉलॉजी बस कल्याण-डोंबिवलीत दाखल होणार, प्रवाशांना गारेगार सेवा मिळणार असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते, पण प्रत्यक्षात प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली. केडीएमटीच्या ताफ्यात केवळ आठ बस अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दाखल झाल्या. त्यापैकी चार बस काही महिन्यांतच बंद पडल्या आणि उर्वरित चार बस विमा नूतनीकरणाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे या गाड्यांचे स्पेअर पार्टच मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यातच विमा भरलेला नसल्याने एसी बस डेपोत उभ्या आहेत.































































