
धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना वृद्धाचा तोल जाऊन ते एक्स्प्रेस आणि फलाटाच्या गॅपमध्ये जाण्याआधीच आरपीएफ आणि एमएसएफ जवानांनी धाव घेऊन त्यांचे प्राण वाचवले. ही थरारक घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली. अश्विनकुमार बर्वे असे या वृद्धाचे नाव असून देव बलवत्तर म्हणून ते बालबाल बचावले.
पुणे-सांतरागाछी हमसफर एक्स्प्रेस कल्याण स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर थांबली. त्यामुळे अश्विनकुमार बर्वे हे पाणी पिण्यासाठी फलाटावर उतरले होते. मात्र काही क्षणातच एक्स्प्रेस स्थानकावरून निघाल्याने घाईघाईत डब्यात चढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी त्यांचा तोल जाऊन ते थेट प्लॅटफॉर्म आणि गाडीमधील धोकादायक गॅपमध्ये पडले. काही अंतरावर ते एक्स्प्रेसच्या दरवाजाला पकडून फरफटत गेले. कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गजानन अंभोरे आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान विशाल जाधव यांच्या लक्षात ही घटना आली. क्षणाचाही विलंब न करता दोन्ही जवानांनी तत्काळ धाव घेऊन वृद्ध प्रवाशाला बाहेर काढले.
सुटकेचा निःश्वास
रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. वृद्धाला वाचवल्यानंतर अन्य प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या कामगिरीमुळे दोन्ही जवानांच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रेल्वे प्रशासनाकडूनही त्यांचे अभिनंदन करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई रेल्वेच्या ‘ऑपरेशन जीवन रक्षा’ मोहिमेंतर्गत करण्यात आली.



























































